ठाणे - भिवंडी शहरात मलनिस्सारण प्रकल्प राबवला जात असून, ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून भुयारी गटारांची निर्मिती केली जात आहे. मात्र कामाच्या ठिकाणी ठेकेदारांसह मनपा प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात कोणत्याही उपायोजना राबवण्यात आलेल्या नाहीयेत. आज दुपारी मलनिस्सारण केंद्राच्या खड्ड्यात पडून ३ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. गौसिया आरिफ शेख असे या दुर्दैवी चिमुरडीचे नाव आहे. तर तिच्यासोबत खड्ड्यात पडललेल्या ५ वर्षांचा रेहान इम्रान शेख याला वाचवण्यात यश आले आहे.
लॉकडाऊन काळात खोदला होता खड्डा
भिवंडी शहरातील चव्हाण कॉलनी कोंडाजीवाडी या भागात उदच्चन केंद्र बनविण्यात येत असून, तेथे सुमारे तीस फूट खड्डा खोदण्यात आला आहे. कोरोना काळात काम बंद असल्याने या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून डबके झाले आहे. शुक्रवारी नजीकच्या झोपडपट्टीतील मृतक गौसिया व रेहान ही दोन चिमुरडी मुले त्या ठिकाणी खेळत असताना, त्यांचा तोल जाऊन ती पाण्यात बुडाली. शेजारीच एका इमारतीचे बांधकाम करणाऱ्या मजुरांच्या ही घटना लक्षात आली. त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरीकांनी पाण्यात उड्या मारून या दोन्ही मुलांना बाहेर काढले, व उपचारासाठी स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी गौसिया आरिफ शेख या ३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. तर रेहान इम्रान शेख हा ५ वर्षांचा चिमुरडा हा या दुर्घटनेत वाचला असून, त्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने नागरिक संतप्त झाल्याने, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत फौजफाटा घेऊन, घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
परिसरातील नागरीकांमध्ये संतापाची लाट
या घटनेनंतर परिसरातील नागरीकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, येथे काम करणाऱ्या ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सुरक्षा रक्षक ठेवणे गरजेचे असताना ते न ठेवल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.