ठाणे - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने अनेकांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाही. ज्यांना रुग्णवाहिका उपब्ध होते, त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते. ही अडचण लक्षात घेऊन ठाण्यातील एका खासगी क्लासच्या शिक्षकाने कोरोनाबाधितांसाठी रुग्णवाहिकेची सेवा सुरू केली आहे. त्याने आपली गाडी कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी दिली आहे.
विनय सिंग असे या शिक्षकाचे नाव आहे, ते शिवशांती प्रतिष्ठान संस्थेमार्फत रुग्णांना सेवा देण्याचे काम करत आहेत. विनय सिंग यांनी आपली स्वतःची गाडी कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी दिली आहे. आतापर्यंत 42 पॉझिटिव्ह रुग्णांना विनय सिंग यांनी मदत केली आहे. विनय सिंग हे रुग्णांना मोफत सेवा पुरवत आहेत.
24 तास मोफत रुग्ण सेवा
ते रुग्णांना रुग्णालयात पोहोचवताना योग्य अशी काळजी देखील घेत आहेत. त्यासाठी त्यांनी गाडीमध्ये विलागिकरण व्हावे म्हणून प्लास्टिक लावले आहे, ते स्वतः पीपीई किट घालून गाडी चालवतात, रुग्णाला सोडून आल्यावर ते गाडी सॅनिटाइझ करतात. ऑक्सिजनची गरज नसलेल्या रुग्णांना देखील ही सेवा देण्यात येत असून, विनय आणि त्यांचे चालक धनंजय सिंग असे दोघे मिळून 24 तास रुग्णांना सेवा देत आहेत.
खासगी क्लास चालकांवर उपासमारीची वेळ
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खासगी क्लास बंद आहेत, त्यामुळे खासगी क्लास चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील विनय सिंग हे कोरोनाबाधितांना मोफत सेवा पुरवत आहेत.
हेही वाचा - घरची परिस्थिती हलाखीची, तरीही शिर्डीची पायल करते विनामुल्य रुग्णसेवा