ठाणे: लखनऊहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये २२ जून रोजी महिला प्रवाशांच्या बोगीत पुरुष प्रवाशी प्रवास करत असतानाच, सोनाली गुजराथी नावाची महिला त्याच बोगीतून प्रवास करीत होती. त्यावेळी त्यांनी पुरुष प्रवाश्यांना तुम्ही बसलात ठीक आहे. मात्र, महिलांना बसण्यासाठी जागा द्या अशी विनंती केली; मात्र या पुरुष प्रवाशांनी महिलांना अरेरावी करण्यास सुरुवात केली. ही बोगी महिलांसाठी राखीव आहे. तुम्ही जनरल बोगीमध्ये जा, मात्र त्यांनी जागाही दिली नाही आणि जनरल बोगीतमध्ये देखील ते प्रवासी गेले नाहीत. हा सगळा घडलेला प्रकार लोहमार्ग पोलिसांच्या सोशल मीडिया ग्रुपवर त्या महिला प्रवाशांनी घटनाक्रम टाकला. विशेष म्हणजे या महिला बोगीत पुरुष फेरीवाले देखील वावर करत असतात, असे व्हिडिओ आरपीएफ ग्रुपमध्ये टाकण्यात आले होते.
डब्यातून महिला पोलीस गायब : महिला बोगीत महिला पोलीस कर्मचारी ड्युटीवर नव्हते. विशेष म्हणजे, पुष्पक एक्सप्रेस इगतपुरीला आली असता प्लॅटफॉर्मवर पोलीस उभे असताना पोलिसांचे महिला राखीव बोगीकडे लक्ष गेले तरी देखील पोलीस त्या बोगीकडे आले नाहीत. तर महिला प्रवासी सोनाली यांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला आवाज देऊन हात केला. मात्र ती महिला पोलीस मोबाईल फोनवर बोलण्यास मग्न होती.
अन् पुरुष प्रवाशी पळाले : दोन तासांनी कल्याण रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस आल्यानंतर फलाटावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले की, बोगीमध्ये पुरुष प्रवासी आहेत त्यांना बाहेर काढा. दोन तासांपूर्वी व्हिडिओ रेल्वेच्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आरपीएफ व कर्मचारी अधिकाऱ्यांनी तत्काळ कल्याण रेल्वे स्टेशनवर धाव घेतली. रात्रीच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्टेशनवर येताच महिला बोगीतील पुरुष प्रवाशांना ताब्यात घेत कारवाई केली. तर आरपीएफला पाहून डब्यातील काही पुरुष प्रवाशांनी पळ काढला होता. यावेळी महिलांच्या डब्यांमधील सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी देखील महिला प्रवाशांनी केली.
पोलीस यंत्रणा काय करते? - रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी लता आरगडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, महिलांच्या बोगीत आसन व्यवस्था आधीच कमी असते. त्यामध्येही पुरुष महिला बोगीत शिरतात. मग त्यावेळी संबंधित आरपीएफ, जीआरपीएफ यंत्रणा काय करते? विशेष म्हणजे प्रत्येक स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. अशा घटनांमुळे आमच्या महिलांची सुरक्षितता धोक्यामध्ये आहे. सर्वसाधारण डब्यामध्ये देखील महिलांवर अत्याचार होतात. महिला डब्यांमध्ये आरपीएफ पोलीस कोणीही नसतात. जर महिलांवर अत्याचार झाला तर त्याची जबाबदारी तुम्ही कोणावर सोपवणार असा प्रश्नही आरगडे यांनी उपस्थित केला.
काय म्हणाले पोलीस अधिकारी? आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश कुमार सिंग याच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, व्हाट्सअपच्या माध्यमातून आम्हाला सूचना मिळाली होती. लखनऊवरून मुंबईला जाणाऱ्या एक्सप्रेसच्या लेडीज कोचमध्ये पुरुष प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. कल्याण स्टेशनवरती एक्सप्रेस पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी तपासणी केली. त्यामधील काही पुरुष महिला सोबत असलेले प्रवासी त्यांना इतर डब्यामध्ये बसवण्यात आले. मात्र, ज्यांच्या सोबत महिला प्रवासी नव्हत्या. अशा पाच प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. त्यांची जामीनवर सुटका झाली असल्याची माहिती राकेश कुमार सिंग यांनी दिली आहे.
हेही वाचा: