नवी मुंबई - आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्यूचे दुःख विसरून नवी मुंबईतील एका दाम्पत्याने मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. एलिजाबेथ जॉश व जोसी सैमी जॉश असे या दाम्पत्याचे नाव आहे. अवयव रूपाने का होईना आमचा मुलगा जिवंत असेल असे जॉश दाम्पत्याने भरल्या डोळ्यांनी सांगितले.
नवी मुंबई परिसरात राहणाऱ्या जेफ्रीन जॉसी या १६ वर्षीय मुलाचा दुचाकी चालवत असताना ३ डिसेंबर अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित नवी मुंबईतील नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. जेफ्रिनला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी ६ दिवस प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, त्याला वाचविण्यास त्यांना यश आले नाही. आपल्या मुलाच्या मृत्यूने जेफ्रीनचे पालक खचून गेले होते. त्यांच्या डोळ्यापुढे अंधार उभा राहिला. मात्र, त्यांनी स्वतःला सावरले, आपले दुःख बाजूला ठेवून त्यांनी आपल्या पोटच्या गोळ्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. आमचा मुलगा जरी या जगातून निघून गेला असला तरी अवयव रुपाने तो जिंवत राहील अशी भूमिका त्यांनी घेतली.
मी आत्ता फक्त जेफ्रिनची आई राहिले नसून सर्व मुलांची आई आहे. बाईक चालवताना हेल्मेट न घातल्याने त्याचा अपघात झाला. दुर्दैवाने तो आज या जगात नाही. त्यामुळे बाईक चालवताना सर्वानी हेल्मेट घालायला विसरू नये वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहनही जेफ्रिनच्या पालकांनी केले. आम्ही आमचा मुलगा अपघातात गमावून बसलो आहे. अशी वेळ कोणत्याही पालकांवर येऊ नये असेही ते म्हणाले. मृत मुलांचे यकृत व दोन मूत्रपिंड दान करण्यात आले असल्याची माहिती डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली.