ठाणे - कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून पीपीई किट देण्यात आले. मात्र काही महाभागांनी वापरलेले पीपीई किट रस्त्याच्या कडेला टाकून कोरोना आजाराला आमंत्रण देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
एकीकडे ठाणे जिल्ह्यात झपाट्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खबदारीचा उपाय म्हणून कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाकडून पीपीई किट देण्यात आले. मात्र काही महाभागांनी नाशिक-मुंबई महामार्गावरील आटगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्याच्या कडेला पीपीई किट टाकून पसार झाले. या घटनेची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाला वापरलेले तीन पीपीई किट रस्त्याच्या कडेला टाकून दिलेल्या अवस्थेत सापडले.
![corona safty PPE kits thrown on nasik-mumbai Highway](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-tha-6-shahapur-3-photo-mh-10007_25042020222855_2504f_1587833935_982.jpg)
शहापूर पोलिसांनी तिन्ही पीपीई किट गोळा करून निर्जंतुककरून एक खड्डा खणून तिन्ही किट जाळून टाकले. त्यानंतर त्यावर माती टाकून पुन्हा खड्डा मातीने बुजवून घटनास्थळ निर्जंतुकीकरण केले. तर खबरदारीचा उपाय म्हणून पीपीई किट आढळून आलेला आजबाजुचा परिसर देखील निर्जंतुकीकरण करण्यात आला.
![corona safty PPE kits thrown on nasik-mumbai Highway](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-tha-6-shahapur-3-photo-mh-10007_25042020222855_2504f_1587833935_342.jpg)
दरम्यान, दोन पंचासमक्ष घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा करण्यात आला असून अज्ञात आरोपी विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे .