मीरा भाईंदर(ठाणे)- काशीमीरा पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याचा आज कोरोनावरील उपचार घेत असताना मृत्यू झाला. काशीमीरा लोकल क्राईम ब्रँच युनिटच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचेही स्पष्ट झाले आहे.पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चार कोरोनाबाधित कर्मचाऱ्यापैकी एक कर्मचारी भाईंदर पश्चिमच्या पंडित भीमसेन जोशी कोविड रुग्णालयात उपचार घेत आहे. दोन कर्मचाऱ्यांना ठाण्यातील वेदांत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.एक कर्मचाऱ्याचे त्याच्या घरीच विलगीकरण करून त्यावर उपचार सुरु आहेत. या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची कोविड १९ चाचणी मीरा रोडच्या वोकार्ड इस्तिपळात करण्यात आली होती. तर सोमवारी त्यांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले.
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना अत्यावश्यक सेवेत काम करणारे डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्यामधील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.या अगोदर मीरा रोड, नवघर, भाईंदर पोलीस ठाणे या सर्व पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते.अनेक पोलीस कर्मचारी उपचार घेऊन घरी परतले तर आपल्या ड्युटी वर रुजू सुद्धा झाले आहेत.
आज काशीमीरा पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. लोकल क्राईम ब्रँचचे चार कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यामुळे मीरा भाईंदर शहरातील पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.