मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा रोडच्या वोकार्ड रुग्णालयात एका कोरोनाबाधित महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. हेतल गांधी नामक महिला सात महिन्याची गरोदर होती. सातव्या महिन्यातच तिची प्रसूती झाली आहे. आई आणि मुलाची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉ. बिपीन जिभकाते यांनी दिली आहे.
मीरा रोड परिसरात राहणाऱ्या हेतल गांधी (वय वर्षं ३५) यांना उच्च रक्तदाब, श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे उपचारासाठी वोकार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाकडून कोविड चाचणी करण्यात आली यामध्ये तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर कोरोना संदर्भात उपचार सुरू करण्यात आले. मात्र महिलेला श्वसनाचा जास्त त्रास होत असल्यामुळे अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. सात महिन्याची गर्भवती असताना महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. आई आणि मुलाची प्रकृती चांगली असल्यामुळे त्यांना वोकार्ड रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.
मीरा रोड वोकार्ड रुग्णालयामधील क्रिटिकल केयर मेडिसीन सल्लागार डॉ. बिपीन जिभकाते म्हणाले की, महिलेच्या तपासणीमध्ये समजले, की ती गर्भवती आहे. महिलेला श्वसनाचा जास्तच त्रास होत होता, ऑक्सिजनची गरज जास्त भासू लागल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. अशा परिस्थितीत डॉक्टर आणि परिचारिकांनी या महिलेची प्रसूती केली. बाळ व बाळंतीण दोघांची प्रकृती चांगली असल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले.