गोंदिया - जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतो. एका कंत्राटदाराने जळालेल्या ऑईलचा वापर करुन दोन किलोमीटर रस्त्याचे बांधकाम केले. चार दिवसातच रस्त्यावरील खडी उखडून बाहेर यायला लागल्याने हा प्रकार उघडकीला आला. या रस्ते बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांनी केला असून शहरात स्वाक्षरी मोहीम राबवली.
गोंदिया शहरातील डॉ. कार्लेकर रुग्णालय ते रेल्वे फाटक या दरम्यान दोन किलोमीटर रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. या रस्त्याचे ३९ लाख रुपयांचे कंत्राट उमेश असाटी या कंत्राटदाराला देण्यात आले. सध्या या रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. कंत्राटदार असाटीने भ्रष्टाचाराची नवीन शक्कल लढवत डांबरीकरणासाठी डांबराऐवजी जळालेल्या ऑईलचा वापर केला. डांबरीकरणानंतर अवघ्या चार दिवसातच रस्त्यावरील खडी उखडून बाहेर आली. त्यामुळे या रस्त्यावरून चालताना नागिरकांना त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा - गुरुवार ठरला घातवार; विविध सात अपघातात ३९ जणांचा मृत्यू
ज्यावेळी या रस्त्याचे बांधकाम सुरू होते त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने या रस्त्याची पाहणी केली नाही. त्यामुळे या बांधकामात कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचे साटे-लोटे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्ता बांधकामाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. लवकरात लवकर आरोपींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.