ठाणे - पावसाळा सुरू झाला आहे. बिळात पाणी शिरल्याने तसेच हवामानातील बदलामुळे, भक्ष्य शोधण्यासाठी विषारी-बिन साप हे बाहेर पडतात. हे साप मानवीवस्तीत शिरल्याच्या घटना महिन्याभरापासून सुरू आहेत. शनिवारी दोन विषारी कोब्रा नाग निघाले. एक मुबंई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील पाईपलाईनची देखरेख करणाऱ्या कर्मऱ्यांच्या चौकीत तर दुसरा साप एका घराच्या किचनमध्ये आढळून आला. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या नागरिकांची घाबरगुडी उडाली होती. त्यानंतर सर्पमित्रांच्या सहाय्याने या दोन्ही ठिकाणच्या सापांना पकडून सुरक्षित स्थळी सोडण्यात आले.
...आणि बीएमसीच्या कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला -
ग्रामीण भागात जंगल, शेती नष्ट करून मोठमोठी गृह संकुले उभारली जात आहेत. त्यातच जिल्ह्यात अचानक वातावरण बदल्याने बिळातून विषारी–बिन विषारी साप भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसापासून वाढल्या आहेत. भिवंडी तालुक्यातील पोगावमधून मुबंई महापालिकेला पाणीपुरवठा करणारी मोठी पाईपलाईन आहे. या पाइपलाईनची देखरेख करण्यासाठी बीएमसीने येथे चौकी उभारली आहे. या चौकीतून बीएमसीचे कामगार पाईपलाईनची देखभाल करीत असतात. मात्र दुपारच्या सुमारास अचानक कामगार फिटर गणेश चौधरी यांना चौकीत लांबलचक कोब्रा नाग घुसताना दिसला. त्यांनी या विषारी नागाला हुसकविण्याचा प्रयत्न केला. मात्र कोब्रा नाग चौकीच्या मागे असलेल्या एका पत्र्याखाली जाऊन दडून बसला. त्यांनतर त्यांनी चौकीत नाग शिरल्याची माहिती सर्पमित्र हितेश करंजावकर यांना दिली. सर्पमित्र हितेश घटनास्थळी पोहोचून शिताफीने या कोब्रा नागाला पकडून पिशवीत बंद केल्याने बीएमसीच्या कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला.
सापाला किचनमधून शिताफीने पकडले -
साप निघाल्याची दुसरी घटना कल्याण पश्चिम परिसरात राहणाऱ्या सापर्डे साईनाथ मढवी यांच्या घरात घडली. मढवी यांच्या घराच्या किचनमध्ये अचानक दुपारच्या सुमारास लांबलचक साप शिरला. साईनाथ यांच्या घरातील महिला दुपारच्या जेवणाची तयारी करीत होत्या. त्यावेळी त्यांना साप किचनच्या खाली असलेल्या कपाटात दिसला. मढवी कुटुंबाने सापाला घाबरून घराबाहेर पळ काढला. यावेळी कुटुंबीयांनी किचनमध्ये साप शिरल्याची माहिती सर्पमित्र हितेशला संपर्क करून दिली. माहिती मिळताच सर्पमित्र हितेश काही वेळातच घटनास्थळी येऊन या सापाला शिताफीने पकडले, साप पकडल्याचे पाहून मढवी कुटुंबानी सुटकेचा निश्वास घेतला.
निर्सगाच्या सानिध्यात सोडून जीवदान -
पाणी पुरवठा विभागाच्या चौकीत निघालेल्या कोब्रा नागासह किचनमध्ये पकडलेल्या सापाला कल्याण वन विभागाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेवून जंगलात निर्सगाच्या सानिध्यात सोडल्याची माहिती सर्पमित्र हितेशने दिली. हवामानात बदल झाल्याने साप भक्ष्य व उब मिळावी म्हणून बिळातून बाहेर येऊन मानवीवस्तीत शिरत असल्याची माहिती हितेश यांनी दिली. कुठे ही मानवी वस्तीत साप दिसल्यास सर्पमित्रांना याची माहिती तत्काळ देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.