ठाणे - डोंबिवलीत एका रेल्वे पादचारी पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरु आहे. मात्र, तेथे रस्ता बंदचा फलक लावला नाही. यामुळे अर्धवट दुरूस्ती झालेल्या पुलावरूनच प्रवाशी जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.
गेल्या महिन्यात मुंबई सीएसटीएम येथील रेल्वे पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांनी जीव गमावले होते. तर कित्येक जखमी झाले होते. या दुर्दैवी घटनेमुळे रेल्वेच्या सर्वच धोकादायक पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा उजेडात आला होता. असाच एक डोंबिवली-ठाकुर्ली रेल्वे स्थानका दरम्यान असलेल्या गणेश मंदिर येथील पादचारी पुलाच्या दुरूस्तीचे काम महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. मात्र, या पुलाचे काम संथ गतीने सुरु आहे. यामुळे नागरिकांना डोंबिवली पश्चीमकडून पूर्वेकडे जाण्यास पर्यायी रस्ता नाही. त्यातच या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु केल्याने पुलावर चड-उतार करणाऱ्या पायऱ्या तुटल्या आहेत. त्यामुळे जीव धोक्यात घालून पुलावरून नागरिकांना ये -जा करावी लागत आहे.