ठाणे - कोरोनाच्या संकटामुळे अगोदरच चिकन विक्रीचा व्यवसाय डबघाईला आला आहे. अशातच एका चिकन सेंटर चालकाला सुरीचा धाक दाखवून त्याच्या गल्ल्यातील रोख रक्कम लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना उल्हासनगरातील कॅम्प नं. 3 येथील धोबीघाट शास्त्रीनगर परिसरात असलेल्या रफिक चिकन सेंटरमध्ये घडली.
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद रफीक याकूब शेख (56) असे चिकन सेंटर चालकाचे नाव आहे. तर विक्रम पवार (31) असे सुरीचा धाक दाखवून रक्कम लुटणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा - भिंवडीमध्ये 'कोरोना' संदर्भातील बातमी करताना पत्रकारावर हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. 3 येथील धोबीघाट शास्त्रीनगर परिसरात मोहम्मद रफीक याकूब शेख यांचे रफीक चिकन सेंटर नावाचे दुकान आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास ते दुकानात बसले असताना त्यांच्या तोंडओळखीचा व्यक्ती विक्रम हा दुकानात आला. त्याने अचानक त्याच्याजवळील धारदार सुरीचा शेख यांना धाक दाखवून त्यांना धक्काबुक्की करत त्यांच्या दुकानाच्या गल्ल्यातील 5 हजार 600 रूपयांची रोख रक्कम जबरीने काढून पसार झाला.
याप्रकरणी चिकन सेंटर चालक शेख यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आरोपी विक्रमविरूध्द तक्रार दाखल करताच पोलिसांनी दोन तासात आरोपी विक्रमला अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेल्या रोख रक्कमेपैकी 3 हजारांची रक्क्कम पोलिसांनी जप्त केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर कोकरे करत आहेत.
हेही वाचा - कोरोना विरोधी लढ्यात पोलिसांचाही सक्रीय सहभाग; ठाणे पोलीस जनजागृतीसाठी रस्त्यावर