ठाणे CCTV On Toll : टोलनाक्यांवरून ये-जा करणाऱ्या गाड्यांची नक्की संख्या आतापर्यंत गुलदस्त्यातच होती. परंतु मनसेनं त्यावर तोडगा काढत, थेट स्वतःचेच सीसीटीव्ही कॅमेरे लावले. मनसेनं मुंबईच्या सीमेवर असलेल्या आनंदनगर आणि एलबीएस टोलनाक्यांवर तब्बल ९० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यातून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात या दोन्ही टोलनाक्यांवरून तब्बल १ लाखाहून अधिक वाहनं पास झाल्याचं समोर आलंय.
राज ठाकरेंचा टोल बंद करण्याचा प्रस्ताव : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि टोलनाके समीकरण तसं फार जुनं. टोलनाक्यांवर होणाऱ्या गैरप्रकारांविरोधात मनसैनिकांनी अनेकदा आंदोलनं केली असून टोलनाके फोडण्याचे प्रकारही घडले आहेत. टोलनाक्यावर झालेल्या दरवाढीच्या विरोधात ठाणे-पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी उपोषण देखील केलं होतं. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकार सोबत बैठक घेऊन टोलनाके बंदच करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र त्यांच्या या प्रस्तावाला सरकारनं टोलवून लावलं. या टोलनाक्यांवरून ये-जा करणाऱ्या गाड्यांच्या संख्येत केवळ ५ टक्केच वाढ झाल्यानं ही दरवाढ मागे घेता येणार नाही, असं सरकारनं सांगितलं.
गाड्यांचा पूर्ण तपशील काढला : त्यानंतर मनसेनं एक अजब शक्कल लढवली. त्यांनी टोलनाक्यांवर थेट स्वतःचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. या कॅमेऱ्यांद्वारे ये-जा करणाऱ्या गाड्यांचा संपूर्ण तपशील काढण्यात आला असून तो लवकरच सरकारला सोपवला जाणार आहे. या सीसीटीव्ही फुटेजचा संपूर्ण डेटा कार्यकर्त्यांद्वारे मनसेच्या वॉर रूम मध्ये गोळा करण्यात आला. याद्वारे या दोन टोलनाक्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची एकूण संख्या स्पष्ट होईल.
मुख्यमंत्र्यांना देणार वाहनांचा डेटा : मनसेचे कार्यकर्ते वाहनांचा हा डेटा मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहेत. काही अधिकारी कंत्राटदारांच्या संगनमतानं वाहनांचा आकडा दडपण्याचं काम करत आहेत जेणेकरून टोल वसूली वाढून मिळावी. हा देशातला टोलचा सगळ्यात मोठा झोल आहे, असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- Raj Thackeray on Toll Plaza : आता टोल नाक्यांवर मनसेच्याही सीसीटीव्हींची नजर - राज ठाकरे
- Raj Thackeray Met CM : टोल प्रकरणी राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, 'शिवतीर्थ'वर होणार निर्णायक बैठक
- BJP VS MNS over Toll issue in Maharashtra : राज्यात टोलच्या झोलवरून भाजपा-मनसेमध्ये जुंपली, नेत्यांची टोलेबाजी तर कार्यकर्त्यांची आंदोलने