ठाणे : कल्याण लोकसभा मतदार संघात शिंदे गटाचे खासदार तथा मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जागेवर भाजपने दावा केला आहे. पक्षाची गेल्या वर्षभरापासून येथे उमेदवार उभा करण्याची तयारी सुरु आहे. यामुळे आता या जागेवरून स्थानिक भाजप व शिंदे गटात खदखद निर्माण झाली आहे.
भाजपची शिंदे गटाला मदत न करण्याची भूमिका : स्थानिक भाजपने एक ठराव करत या जागेवर शिंदे गटाला मदत करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देतो, असे म्हटले होते. त्यामुळे युतीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र आता यावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस टी. सी. रवी यांनी व्यक्तव्य केले आहे. खासदार श्रीकांत शिंदेंना राजीनामा देण्याची गरज नसून युतीत सर्व काही अलबेल असल्याचे ते म्हणाले. मात्र यावर त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले आहे.
स्थानिक भाजप-शिंदे युतीत वाढता तणाव : गेल्या वर्षभरात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभा मतदार संघात चार वेळा येऊन गेले आहेत. त्यांनी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या जागेवरून भाजप - शिंदे युतीत तणाव निर्माण झाला होता. त्यातच डोंबिवली पूर्व भाजपचे अध्यक्ष नंदू जोशी यांनी एका महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा शिंदे गटाच्या नेत्यांमुळे दाखल केल्याचा समज भाजपच्या स्थानिक नेत्यांनी करत, त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या बदलीच्या मागणीसाठी मोर्चा काढला होता. मात्र शेखर बागडे हे शिंदे यांचे जवळचे असल्याने त्यांची बदली अद्यापही झाली नाही. त्यामुळे येथे भाजप-शिंदे युतीत आणखी तणाव निर्माण झाला आहे.
टी. सी. रवी भिवंडीत : मोदी सरकारच्या 9 वर्षाच्या काळात झालेल्या कामाचा लेखाजोखा नागरिकांपर्यत पोचविण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय स्तरावर संपर्क अभियान सुरु आहे. यासाठी आज भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस टी. सी. रवी हे भिवंडीत आले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, राज्य सरचिटणीस कृपा शंकर सिंग यांच्यासह बहुतांश स्थानिक नेते उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस टी. सी. रवी यांच्या स्वागतासासाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा :