ठाणे - भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कामचुकारपणा केल्याचे निदर्शनास आल्याने पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी 'त्या' दोघांची तडकाफडकी निलंबन केले. सार्वजनिक आरोग्य विभागातील लिपिक तथा कार्यालयीन अधिक्षक दिलीप माळी आणि सफाई कामगार रविंद्र हरिश्चन्द्र सकपाळ असे निलंबित केलेल्या पालिका कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हिरे यांच्या कारवाईने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
लिपिक दिलीप माळी हे पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात, आरोग्य निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी पालिकेच्या 'स्पॉट फाईन ' पथकाने कारवाई करून जप्त केलेले प्लास्टिक आणि अन्य साहित्याचे लिलावाद्वारे विल्हेवाट प्रलंबित ठेवून प्रशासकीय सेवेत बाधा टाकण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा अहवाल उपायुक्त ( आरोग्य ) सुनिल भालेराव यांनी आयुक्तांकडे सादर केला होता. त्यामध्ये दिलीप माळी हे दोषी आढळल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत सफाई कामगार रविंद्र सकपाळ यांची भिवंडी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नेमणूक करण्यात आली होती. मात्र एक महिन्याच्या कालावधीनंतर २३ मे रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. असे असताना पालिका कर्मचारी रविंद्र सकपाळ हे प्रभाग समिती क्र.५, वार्ड क्र ६ येथे आपल्या कर्तव्यावर हजर झाले नाहीत. त्याबाबतचा अहवाल आरोग्य निरीक्षक हरीश भंडारी यांनी आरोग्य उपायुक्तांना सादर केला होता. त्यामध्ये सकपाळ हे परस्पर गैरहजर राहत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले.
दोघांचा अहवाल आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडे सादर केल्याने त्यांनी सर्व बाजू तपासल्या असता या दोन्हीं कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपिल ) ( वर्तणूक ) नियम ३ चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र महानगपालिका अधिनियम १९४९ चे कलम ५६ (२) ( फ ) नुसार विभागीय चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी लिपिक दिलीप माळी आणि सफाई कामगार रविंद्र सकपाळ या दोघा कर्मचाऱ्यांना पालिका सेवेतून तात्काळ निलंबित केले आहे. दरम्यान आयुक्तांच्या कारवाईने कामचुकार कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.