नवी मुंबई - रिपब्लिक भारत टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचे आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट शुक्रवारी सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने एकच खळबळ उडाली. या चॅटची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मात्र, हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळले जात असल्याचेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अर्णब गोस्वामीच्या कथित लिक झालेल्या चॅट संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अर्णबच्या या व्हॉटसअॅप संभाषणाची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. एयर स्ट्राईक हा अतिशय गोपनीय होता. त्याबाबत असे संभाषण करणारे चुकीचे असल्याचे आठवले यांनी सांगितले. सैन्याच्या कारवाईबाबत गोस्वामीला अगोदर माहिती भेटली होती असे सांगणे, म्हणजे संरक्षण खात्यावर संशय व्यक्त केल्यासारखे आहे, असे आठवले यांनी सांगितले.
ही अतिशय गंभीर बाब -
हे संभाषण अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे याची चौकशी होणे गरजेचे आहे. मात्र, त्याला चुकीच्या पद्धतीने हायलाईट केले जात आहे, असे आठवलेंनी नवी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
काय आहे प्रकरण -
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे.