मीरा भाईंदर - मीरा भाईंदर महानगरपालिका प्रवेशद्वारावर पालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या कंत्राटी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांच्या पगारात कपात करण्याचा पालिकेकडून कट रचला जात आहे. कोरोना काळात काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी कोविड भत्ता मिळण्यापासून अजूनही वंचित आहेत. त्यात आता पालिकेने नवीन भरती सुरू केली असून त्यात भरती होऊन नवीन नियमानुसार पगार घ्यावा, असा दबाव कार्यरत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर टाकण्यात येत आहे. मात्र डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी सेवेत कार्यरत असताना कमी पगारामध्ये काम करण्यासाठी नवीन भर्तीसाठी पालिकेकडून एक परिपत्रक काढण्यात आले आहे. त्याचा विरोध करत हे कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
कोरोना काळात जेव्हा कोणी काम करायला तयार नव्हते, तेव्हा या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून अनेकांचे जीव वाचवले. पालिका प्रशासन हा अन्याय करत असल्याची टीका या कर्मचाऱ्यांकडून होत आहे. आमच्या कोरोना काळातील सेवेचा अपमान करुन डिमोशन करण्यात येत आहे, असे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.