ठाणे - काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील फुटपाथवर अनधिकृतरीत्या उभे असलेले जाहीरात फलक सायकल स्टँडवर कोसळले. हे जाहिरात फलक वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सायकल स्टँडच्या मागे उभे करण्यात आले होते. या घटनते कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठा अनर्थ टळला.
ठाणे मनपा जाहीरात विभागाकडून पाच वर्षाकरता २५ फिरत्या वाहनांना जाहिरात करण्याची परवानगी देण्यात येणार होती. परंतु, यापैकी फक्त ४ मोबाईल वाहनांस परवानगी देण्यात आली आहे. वाहतूक विभागाद्वारे जाहीरात करण्यासाठी स्थळेही निश्चित करण्यात आली आहेत. या फिरत्या जाहीरात वाहनांची मुदत डिसेंबर महिन्यात संपली आहे. परंतु, ठरलेल्या वाहन संख्येपेक्षा जास्त वाहने जाहीरात करताना शहरात दिसत आहेत.
या जाहिरात वाहनांचे क्रमांक वाहतूक विभाग व ठाणे मनपा जाहिरात विभागाकडे उपलब्ध नाहीत. यामुळे मोठ्या प्रमाणावर महापालिकेच्या हद्दीत मर्यादेपेक्षा अधिक वाहने जाहीरात करत असल्याचे समोर आले आहे. याबद्दल कारवाई करण्यास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे. शहरात खांबावर व फिरत्या वाहनांमध्ये जाहिरात करण्याची परवानगी मे. मार्स इंटरप्राईज व रोनक अॅडव्हरटायझिंग कंपनीस दिलेली आहे.
पदपथवर उभ्या असलेल्या जाहिरात फलकांबाबतची तक्रार वाहतूक विभाग व ठाणे मनपाकडे केली होती. तरीही यावर अद्याप काहीच कारवाई केली नाही. या एका जाहिरात वाहनाचे भाडे महिन्याला २ लाख रुपये आहे. वाहन क्रमांक मनपाकडे उपलब्ध नसल्याने २५ च्यापेक्षा अधिक वाहनांस जाहीरात करण्यास छुपी सूट दिली आहे, असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.