नवी मुंबई - उलवे येथे महिलेचे कारसह अपहरण करत त्यानंतर गोळ्या झाडून खून करणाऱ्या आरोपीला अखेर नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अशोककुमार मृगण कोनार (42) याला अटक केली आहे. तो मूळचा तमिळनाडूचा असून सद्यस्थितीत तो उलवे सेक्टर 9 मध्ये राहत असून तो व्यवसायाने मोटारचालक आहे.
काय आहे प्रकरण -
उरणमधील शेलघर गावात राहणारे बाळकृष्ण भगत (55) त्यांची पत्नी प्रभावती भगत (50) यांच्यासह त्यांच्या पनवेलमधील नातेवाईकांच्या घरी जात होते. उलवे सेक्टर 19 मध्ये बाळकृष्ण यांनी त्यांची स्विफ्ट गाडी उभी केली व पत्नीला गाडीत बसवून ते स्वतः पैसे काढण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये गेले. यादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने प्रभावती यांना लुटण्याच्या उद्देशाने गाडी सुरू केली व त्यांच्यासह गाडी चोरून नेली. त्यानंतर वहाळ परिसरात नेऊन प्रभावती यांच्या अंगावरील दागिने लुटले व त्यांना गोळी झाडून ठार केले होते. संबंधित आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी अखेर गजाआड केले आहे.
संबंधित आरोपीने हा खून नियोजन करून व पाळत ठेवून केला आहे. सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय सूत्र यांच्या माध्यमातून आरोपींपर्यत पोहचण्यासाठी पोलिसांना यश आले आहे. चार मार्चला संध्याकाळी सहाच्या दरम्यान खारघर येथील तळोजाकडे आरोपी येत असल्याची खात्रीपूर्वक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर विकास भवन चौक खारघर येथून पोलिसांनी आरोपी अशोककुमार याला अटक केले आहे. पोलीस तपासात आरोपीकडे एक देशी पिस्तूल, दोन मॅगझीन, नऊ जिवंत काडतुसे, एक मोबाईल फोन अशा गोष्टी आढळून आल्या आहेत.
पोलीस चौकशीत आरोपीने प्रभावती यांचा खून केल्याचेही कबूल केले आहे. तसेच आरोपी जी कार घेऊन फिरत होता ती कारही वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली आरोपीने दिली आहे. ती कार तो बनावट नंबर प्लेट लावून वापरत होता. त्याच्यावर वाहन चोरीचेही आरोप असून या प्रकरणी वाशी व एनआयआर पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीला आज पनवेल न्यायालयात हजर केले आहे.