ठाणे - शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील एका आदिवासी पठ्ठ्याने माळरानात क्रिकेटचे धडे गिरवत त्याने किक्रेटच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यापर्यंतची मजल गाठली आहे. या पठ्ठ्याची निवड थेट थायलंड क्रिकेट प्रीमियम लिग स्पर्धेत निवड झाली आहे. वैभव विजय हिलम (वय 20 वर्षे), असे या पठ्ठ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे वैभव हा जागतिक किक्रेटपटू विराट कोहलीचा चाहता असल्याचे त्याने सांगितले.
मैदानात दुहेरी शतक ठोकले अन नशीब फळफळले
शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात वाफे गावात वैभवचे कुटूंब राहते. त्याचे वडील भातसा धरण पाणीपुरवठा विभागात कार्यरत आहेत. वैभवला लहानपणापासूनच किक्रेटची आवड असल्याने शाळा सुटताच तो माळरानातील मैदानात मित्रांसोबत तहानभूख हरवून किक्रेट खेळत होता. कधी-कधी तर त्याची आई त्याला शोधण्यासाठी माळरानातील मैदानात जाऊन एवढे किक्रेटचे वेड बरे नव्हे असे बोलून त्याला घरी घेऊन येत होती. त्यांनतर महाविद्यालयीन जीवनात वडिलांनी त्याच्या किक्रेटची आवड पाहून त्याला शहापूर शहरातील एका किक्रेट क्लबमध्ये प्रवेश मिळवून दिला. त्यानेही जिद्द आणि मेहनतीच्या बळावर एका सामन्यात 275 धावांची खेळी केल्याने त्याचे ठाणे जिल्हा पातळीवर नाव होऊन त्याची ठाणे किक्रेट क्लब संघात निवड झाली. त्यांनतर सतत फलंदाजी व गोललंदाजी आणि क्षेत्ररक्षण यामध्ये अपेक्षित कामगीरी करीत ऑलराऊंटर म्हणून मुंबईच्या एका किक्रेट क्लबमधून तो खेळायला लागला.
मुंबईच्या मैदानातील शतकी खेळीने त्याला पोहचवले सातसमुद्रापार
टाळेबमदीपूर्वी मुंबईच्या किक्रेट क्लबमधून खेळताना वैभवने बलाढ्य संघासमोर शतकी खेळी उभारली होती. त्यावेळी अंतरराष्ट्रीय निवड समितीचे अंकित मिश्रा यांनी त्याच्या फलंदाजीसह मैदानातील खेळीचा प्रवास पाहिला. त्यानंतर वैभवची निवड थायलंडमध्ये होणाऱ्या थायलंड क्रिकेट प्रीमियम लिग स्पर्धेसाठी केली आहे, असे वैभव म्हणाला.
बँकांमधून कर्ज काढून वैभवला दिले किक्रेटचे धडे
सातवीत शिकत असताना वैभवला क्रिकेटची खूपच आवड निर्माण त्याची आवड लक्षात घेऊन त्याच्या वडिलांनी बँकांमधून कर्ज काढून कल्याण, मुंबई, नागपूर , गुजरात याठिकाणी त्याला क्रिकेट खेळण्यासाठी पाठविले. त्यातच मुलगा क्रिकेट खेळण्यासाठी परदेशीवारी करणार असल्याचा आनंद त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मात्र, आदिवासी समाजाच्या उन्नीतीसाठी गप्पा मारणारे आदिवासी समाजातील नेत्यांनी किंवा स्थानिक क्रीडा अधिकाऱ्यांनी वैभवला आर्थिक मदत मिळून देणे तर सोडाच त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याबाबत त्याचे साधे कौतुकही केले नसल्याची खंत वैभवच्या आई-वडीलांनी व्यक्त केली.
हेही वाचा - मुसळधार पावसामुळे उरणच्या ग्रामीण रुग्णालयात साचले तळे