ठाणे - भिवडीत एका सार्वजनिक शौचालयाला भीषण आग लागली. ही घटना आज सकाळच्या सुमारास वीजवितरणच्या पॉवर हाऊसच्या भिंतीलगत असलेल्या सार्वजनिक शौचालयात घडली. या भीषण आगीत संपूर्ण सार्वजनिक शौचालय जळून खाक झाले.
भिवंडी शहरातील कल्याण-भिवंडी रोडवर जुने पॉवरहाऊस असून या ठिकाणावरून वीजपुरवठा होतो. तर, त्याच्याच बाजूला अधिकारी-कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. या परिसरात नागरी वस्ती असल्याने भिवंडी महापालिकेने २० ते २५ वर्षापूर्वी पॉवरहाऊस समोरच्या फुटपाथवर नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय उभारले होते. कालांतराने याठिकाणी फायबरचे शौचालय उभारण्यात आले. मात्र, हे शौचालय दुरावस्थेत असूनही महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. अशातही परिसरातील नागरिक या शौचालयाचा वापर करीत होते. त्यातच आज सकाळच्या सुमाराला अचानक शौचालयाला आग लागली.
शौचालय फायबरचे असल्याने आग वाढली
शौचालय फायबरचे असल्याने आगीने काही वेळात भीषण रूप धारण केले. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाची १ गाडी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण शौचालय जळून खाक झाले होते. सुदैवाने शौचालयालगत असलेल्या पॉवर हाऊसला उंच भिंत आहे. त्यामुळे, ही आग पावर हाऊसपर्यंत पसरली नाही. जर आगीच्या कचाट्यात पॉवर हाऊस सापडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. विशेष म्हणजे, आग लागली त्यावेळी शौचालयात कोणीही नव्हते. त्यामुळे, कोणालाही दुखापत झाली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
हेही वाचा - जमील शेख हत्या प्रकरण : ठाणे पोलिसांची तीन पथके उत्तरप्रदेशात; आरोपी यूपीतील शूटर