ठाणे - फटाक्याचा धूर व ठिणग्यांसह कर्कश आवाज सहन होत नसल्याने घरासमोर फटाके वाजवू नका, अशी विनंती करणाऱ्या माय-लेकाला परप्रांतीय शेजाऱ्यांच्या ६ ते ७ जणांच्या टोळक्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना कल्याण वालधुनी परिसरात घडली असून या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात हल्लेखोर शेजाऱ्यांविरुद्ध फक्त अदखल पात्र गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे पीडित कुटुंब भीतीच्या छायेखाली असल्याचे समजले आहे.
भाऊबीजच्या दिवशी रात्री दहाच्या सुमारास आजूबाजूचे काही टवाळखोर तरुण अभिजीत वाघमारे (रा. वालधुनी परिसर, कल्याण) यांच्या घरासमोर मोठ्या आवाजाचे फटाके वाजवत होते. वाघमारे यांनी तरुणांना फटाक्याचा आवाज होत असून ठिणग्या घरात येत असल्याने लहान मुलांसह वृद्ध आजीला त्रास होत असल्याचे सांगितले. तसेच, तरुणांना फटाके फोडू नये अशी विनंती केली. मात्र, दारूच्या नशेत धुंद असलेल्या टवाळखोर तरुणांनी अभिजीतला घराबाहेर बोलवून त्याला बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर अभिजीतला सोडवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या आई उषा वाघमारे याना देखील बेदम मारहाण केली.
या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी मारहाण करणाऱ्या टवाळखोर शेजाऱ्यांविरोधात केवळ अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे. मात्र, वैद्यकीय प्रमाणपत्र आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे कल्याणचे एसीपी अनिल पोवार यांनी सांगितले.
हेही वाचा - कोरोनाबाधित महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म.. श्वास घेण्यास त्रास होताना रुग्णालयात झाली होती दाखल