नवी मुंबई - दिवसेंदिवस नवी मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नवी मुंबई कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलची नर्स व नवी मुंबईत राहणाऱ्या वार्डबॉयला काल कोरोना झाल्याची घटना ताजी असतानाच, आज एपीएमसीतील धान्य मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. या व्यापाऱ्याला कोरोना झाल्याचे कळताच बाजारातील व्यापारी, माथाडी कामगार, वाहतूकदार यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. या व्यापाऱ्याला वाशीच्या मनपा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एपीएमसी मार्केटमधील नवी मुंबईतील धान्य मार्केटमधील व्यापाराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. संबधीत कोरोनाबाधित व्यापारी दोन ते तीन वेळा बाजारात आला होता, अशी माहिती काही व्यापारांनी दिली. त्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण पसरले आहे. या अगोदरही मसाला मार्केटमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. काल (बुधवार) अपोलो हॉस्पिटलची नर्स व एका वार्डबॉयलादेखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्केटच्या गेटवर थर्मल चेकअप, सॅनिटायझर आणि मास्क तोंडाला बांधून प्रवेश देण्यात यावा, अशा जाहीर सूचनेचा फलक लावण्यात आल आहे. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंडही बाजार समितीत आकारण्यात येत असून सोशल डिस्टन्सिंगसाठी आवाहनही करण्यात येत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या देशातील 170 कोरोनाच्या हॉटस्पॉट यादीत नवी मुंबईचाही समावेश आहे. नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 59 वर पोहोचली असून दिवसेंदिवस या संख्येत वाढ होत आहे.