ठाणे - ठाण्यातील विविआना मॉल परिसरात नाताळच्या पार्श्वभूमीवर भव्य असे 21 फुटांचे फुलांचे ख्रिसमस ट्री उभारण्यात आले आहे. तसेच मॉलमध्ये 37 फुटांचे काचेचे ख्रिसमस ट्री उभारण्यात आले आहे. हे दोन्ही ख्रिसमस ट्री सध्या मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत.
कोरोना संकटामुळे 2020 हे वर्ष सर्वांसाठी त्रासदायक गेले आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपला जीव गमावला, तर अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले. मात्र आता येणारे नववर्ष हे सर्वांसाठी आंनदाचे जावे, येणाऱ्या वर्षात सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात या संकल्पनेवर आधारीत या ख्रिसमस ट्रीची निर्मिती करण्यात आली आहे. हे ख्रिसमस ट्री पाहाण्यासाठी नागरिक या ठिकाणी गर्दी करत आहेत.
ख्रिसमस ट्री शेजारी ठेवला गिफ्ट बॉक्स
दरम्यान या ख्रिसमस ट्रीच्या शेजारी गरीब, गरजू मुलांसाठी एक गिफ्ट बॉक्स ठेवण्यात आला आहे. गरीब मुलांसाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मॉलच्या वतीने ग्राहकांना करण्यात आले आहे. या बॉक्समध्ये जमा होणाऱ्या वस्तू गरजू मुलांना वाटण्यात येणार आहेत.