ठाणे - कल्याण पश्चिमेला सुभाष चौक येथे उल्हासनगरच्या दिशेकडून येणाऱ्या संशयित चारचाकी वाहनांची तपासणी केली. यात 12 लाख 48 हजारांची रोकड पकडण्यात आली आहे. मंगळवारी रात्री 12 वाजता ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा- 'ईडी'ची पीडा आता प्रफुल पटेल यांच्यामागे, म्हणाले नोटीस हातात आल्यास चौकशीलाही सामोरे जाऊ
कल्याण पश्चिमचे निवडणूक निर्णय अधिकारी अजिंक्य पडवळ आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुहास गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत भरारी पथक प्रमुख दामोदर साळवी व त्यांचे सहकारी देखील यात सहभागी होते. कल्याण पश्चिमेला सुभाष चौक येथे उल्हासनगरच्या दिशेकडून येणाऱ्या संशयीत चारचाकी वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये 12 लाख 48 हजार रुपयांची रोकड सापडली. पथक प्रमुख साळवी यांनी रोकडबद्दल वाहन चालकाकडे विचारणा केली. मात्र, वाहन चालक कोणतीही माहिती देऊ शकला नाही. हस्तगत केलेली रक्कम महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यामध्ये जमा केली आहे. रक्कम घेऊन जाणाऱ्या व्यक्तीने त्याच्याकडे रोख रक्कम काढल्याचे व घेऊन जाण्याचे योग्य पुरावे दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात समितीसमोर याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. विधानसभा निवडणुकीत कल्याणमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या घटनेमुळे विधानसभा निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांच्या पक्षाचे कारनामे चव्हाट्यावर आले आहेत.