सोलापूर - शाळेचा पहिला दिवस पहिल्यांदाच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुतुहलचा दिवस ठरतो. त्याचप्रमाणे आज पंढरपूर तालुक्यातील घालमे पवार वस्तीवरील अक्षरांगण या जिल्हा परिषदेच्या शाळेनेही विद्यार्थ्यांचा पहिला दिवस अविस्मरणीय केला आहे. यासाठी त्यांनी पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे फुगे, गुलाबपुष्प देत ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढली आणि स्वागत केले. यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये औत्सुक्य व उत्साहाचे वातावरण होते.
नारळाच्या फाद्यांनी व केळीच्या खुटांनी सजवलेल्या शाळेत शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व पालक-ग्रामस्थांनी उत्फुर्तपणे केलेल्या स्वागताने विद्यार्थी भारावून गेले होते. यावेळी बाल विद्यार्थ्यांनी सुंदर सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये हातात रंगीबेरंगी फुगे घेऊन डॉल्बीच्या बालगीतांवर ठेका धरला. तर परिसरातील ग्रामस्थांनीही या मिरवणुकीवेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके हातात पाहून तर फारच आनंद झाला. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात गणवेशाचे वाटप करण्यात आले. नानासाहेब घालमे गुरुजींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मुख्याध्यापक प्रशांत वाघमारे यांनी संयोजन केले, शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज साळुंखे यांनी प्रास्तविक तर दशरथ काटकर यांनी आभार मानले. गटशिक्षिणाधिकारी सुलभा वटारे, नानासाहेब घालमे गुरुजी , विस्तारअधिकारी डाँ.बिभिषण रणदिवे, केंद्रप्रमुख मीरा पवार, शगुफ्ता तांबोळी यांनी प्रोत्साहन दिले. यावेळी नानासाहेब घालमेगुरुजी, लक्ष्मण साळुंखेसह ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.