सोलापूर - येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना एका भरधाव कारने मागून धडक दिली. या अपघाताचा थरारक व्हिडिओ हा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला पाहिल्यानंतर 'काळ आला होता पण वेळ नाही' या म्हणीची प्रचिती येते, असा हा भयंकर अपघात शुक्रवारी मध्यरात्री घडला आहे.
या अपघात जखमी झाल्यांना सोलापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात सतीश प्रल्हाद गावडे (३० रा. श्रीनगर, जुळे सोलापूर), अमित सिद्धेश्वर खांडेकर (२९ रा. सैफुल, विजापुर रोड, सोलापूर) हे जखमी झाले आहेत.
भरधाव कारने दुचाकीसह दिली भिंतीला धडक -
शुक्रवारी मध्यरात्री कार आणि दुचाकी वाहन एकाच मार्गाने जात होते. कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार नियंत्रणबाहेर गेली. बाजूने जात असलेल्या सतीश गावडे व अमित खांडेकर यांच्या दुचाकीसह सोन्याच्या दुकानाच्या भिंतीला या भरधाव कारने जोरदार धडक दिली. त्यात सतीश गावडे हा दुचाकीवरून उडून खाली पडला आणि त्याच्या अंगावर लोखंडी गेट कोसळले. यात ते दोघेही जखमी झाले आहेत.
थरकाप उडविणाऱ्या अपघाताचे दृश्य सीसीटीव्हीत कैद-
चारचाकी वाहन अतिशय वेगात येऊन एका सोन्याच्या दुकानाच्या भिंतीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक समोरील बाजूस उडून पडला. थरकाप उडविणारे या अपघाताचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. आणि हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रात्री दीडच्या सुमारास नागरिकांनी जखमी दोघा दुचाकीधारकांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
हेही वाचा - स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणासाठी पंढरीत ओबीसी समाजाचा रस्ता रोको