सोलापुर (माढा) - समाजात उशिरानेका होईना देहदानाचे महत्व पटू लागले आहे. माढ्यातील त्रिशला रमणलाल साबळे (वय, ५१ यांचे) नुकतेच निधन झाले. त्यानंतर त्रिशला यांचे बंधू प्रशांत साबळे यांनी त्रिशाला यांचा अंत्यविधी न करता त्यांचा देन दान करण्याचे ठरवले. त्या पार्श्वभूमीवर येथील सर्व सहकाऱ्यांनी मदत केल्याने येथील अश्विनी मेडिकल महाविद्यालयात त्रिशला यांचा मृतदेह दान करण्यात आला.
मरणोत्तर देहदान करण्यात आले
अश्विनी मेडिकल महाविद्यालय सोलापुर यांच्याकडे हा मृतदेह सोपवण्यात आला. त्रिशला साबळे यांचे ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी हद्ययविकाराने निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे बंधु प्रशांत साबळे यांचेसह त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या देहाची मरणोत्तर देहदान करण्याची तयारी दर्शवली. हे समजताच शहरातील विशाल शहा, डाॅ. पंकज दोशी, अनिल दोशी यांनी सोलापुरातील अश्विनी रुलर मेडिकल कॉलेज येथे संपर्क साधून देहदानाची प्रक्रिया करण्यासाठी हालचाली केल्या. त्यानुसार अश्विनी मेडिकल महाविद्यालयातील श्रीमती. गोसावी यांनी देखील रविवारी रुग्णवाहिका माढ्यात पाठवून देह नेण्याची व्यवस्था केली. अनिल दोशी, डाॅ. पंकज दोशी, विशाल शहा यांनी तत्परतेने हालचाल केल्याने मरणोत्तर देहदानाची प्रकिया पुर्ण झाली.
अत्यंसंस्कार करण्याच्या पारंपरिक प्रथेला बगल देत
साबळे परिवाराने उत्स्फूर्त पणे कुटुंबातील सदस्याचे घेतलेल्या मरणोत्तराचा निर्णय अनुकरणीय असाच आहे. त्यांच्या निर्णयाचे समाजातुन कौतुक होत आहे. दरम्यान, माझ्या बहिणीचे देहदान व्हावे असे मला वाटले. मी त्या दृष्टीने हालचाली ही केल्या मला ही मदत मिळत गेली. बहिणीच्या देहाचा मेडिकल कॉलेजमधील भावी डाॅक्टराना अभ्यासासाठी फायदा होणार आहे. हीच आमच्या परिवारासाठी अभिमानाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया प्रशांत साबळे यांनी दिली.
यावर संपर्क करावा
यावेळी देहदानासह, अवयव दान, नेत्रदान हे करणे सध्या गरजेचे बनले आहे. माढ्यासह परिसरातील कोणत्याही गावातील कुटूबियांना आपल्या दगावलेल्या व्यक्तिचे देहदान करावयाचे असल्यास 9423333155 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विशाल शहा यांनी केले आहे.