सोलापूर - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडी या केंद्रीय तपास संस्थेकडून अटक झाली आहे. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. सोलापुरातील राष्ट्रवादी नेत्यांच्या उपस्थितीत नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर ईडीच्या निषेधार्थ आंदोलन केले. ( Minister Nawab Malik ) यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. केंद्रीय तपास संस्थेकडून राज्याचा एका कैबीनेट मंत्र्याला अटक होते, केंद्र सरकार सत्ता प्राप्त करण्यासाठी षडयंत्र रचत आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
राज्यातील सत्ता आपल्या हाती घेण्यासाठी भाजपाच्या खेळी-
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्या पासून भारतीय जनता पार्टी वेगवेगळ्या प्रकारे षडयंत्र रचत आहे.केंद्रातील सीबीआय, इन्कम टॅक्स, एनआयए,ईडी या तपास संस्थाकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.नवाब मलिक यांनी भाजपा विरोधात अनेक खुलासे केले म्हणून त्यांना एका जुन्या प्रकरणात नाहक गोवण्यात आले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी यावेळी बोलताना केला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची आंदोलनाला दांडी-
महाविकास आघाडी राज्य सरकार मधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक करून ईडी कोठडीत रवानगी केली आहे.याविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कडवट प्रतिक्रिया दिली आहे.राष्ट्रवादीने राज्यभर नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकार विरोधात ,ईडी विरोधात आंदोलन छेडले आहे.मात्र या आंदोलनाला महाविकास आघाडीमधील नेत्यांनी पाठ दाखवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाला सोलापुरातील काँग्रेस, शिवसेना या पक्षातील नेत्यांनी दांडी मारली होती.महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील नेते आणि कार्यकर्ते ना आल्याने राष्ट्रवादीचेच नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
काय झाले?
राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. 'लढेंगे जितेंगे, ईडी के आगे नही झूकेंगे, एक्सपोज करेंगे' अशी प्रतिक्रिया मलिक यांनी दिली आहे. नवाब मलिक यांची ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ही पहिली प्रतिक्रिया आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची आज ( बुधवारी ) सकाळपासूनच ईडी कार्यालयात चौकशी सुरू होती. अखेर त्यांना आता ईडीने अटक केली आहे. आज पहाटे पाच वाजताच्या दरम्यान ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या कुर्ल्यातील राहत्या घरी पोहोचले. तिथे काही वेळ नवाब मलिक यांनी अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांना 7.45 दरम्यान ईडी अधिकारी आपल्या कार्यालयात घेऊन आले. अखेर चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - नवाब मलिकांची बहीण सईदा खानला ईडी कार्यालयात प्रवेश नाकारला