पंढरपूर - राज्यातील उद्धव ठाकरे सरकार हे आंधळे, बहिरे, मुके सरकार असल्याची टीका महायुतीचे नेते आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सादाभाऊ खोत यांनी केली. दूध दरवाढी संदर्भात भाजप आणि मित्रपक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. खोत यांनी देखील पंढरपुरात पांडुरंगाला दुधाचा अभिषेक घालून दूध आंदोलनाला सुरुवात केली.
पंढरपूर येथील सांगोला चौकात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमाला अभिवादन करून व पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी दुधाचा अभिषेक घालून या आंदोलनाला खोत यांनी सुरुवात केली.
या राज्य सरकारने दूध उत्पादन शेतकऱ्याच्या गाईच्या दुधाला १० रुपये अनुदान घ्यावे व दुधाच्या भूकटीला प्रति लिटर ५० रुपये निर्यात अनुदान देण्याची सरकारला सुबुद्धी दे बा..विठ्ठला असे साकडे पांडुरंग चरणी खोत यांनी घातले आहे.
माजी मंत्री खोत म्हणाले, राज्य सरकार रोज एक कोटी ६० लाख लिटर दूधाचे संकलन करत आहे. त्यात ६० लाख दूध हे बंद पिशवीतून विक्री होत असते. अतिरिक्त ५० लाख दुधाची भुकटी तयार केली जात असते. सध्या शेतकऱ्याच्या गाईच्या दुधाला २० लिटर दर आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात दुधाला ५ रुपये प्रति लिटर अनुदान दिले जात होते. मात्र, हे सरकार शेतकऱ्याच्या दुधाला अनुदान देण्याच्या नावाखाली आंधळे, बहिरे, मुके पणाची भूमिका घेत आहे. तरी सरकार शेतकऱ्याच्या दुधाला १० रुपये तर दुधाच्या भूकटीला ५० रुपये अनुदान देण्याची मागणी खोत यांनी केली.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रणव परिचारक, माऊली हलणवर, नितीन कारंडे, दत्तात्रेय मस्के आदी उपस्थित होते.