पंढरपूर - ईडी व आयकर विभागाकडून राज्यामध्ये धाडी ही स्टंटबाजी आहे. सर्वसामान्य ते राजकीय नेत्यांपर्यंत ज्या ठिकाणी ईडी व आयकर विभागाने धाडी टाकल्या त्यात काय निष्पन्न झाले ते सांगावे. विविध ठिकाणी धाडी टाकण्याच्या बातम्या येतात, मात्र त्यानंतर मांडवली तर होत नाही ना. आयकर विभाग हा राजकीय सूड घेण्यासाठी आहे का, असा खरमरीत सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी विचारला आहे.
हेही वाचा - ..हे तर केंद्र आणि राज्य सरकारचे कारस्थान, सरकारला बुद्धी देण्याचे राजू शेट्टींचे अंबाबाई चरणी साकडे
'सरकारला सुबुद्धी दे'
माजी खासदार राजू शेट्टी यांची 'जागर एफआरपीचा आराधना शक्तीपीठांची' ही यात्रा पंढरपुरात येऊन ठेपली. त्यावेळी त्यांनी विठ्ठल व रुक्मिणी मातेचे दर्शन घेत एफआरपी संदर्भात केंद्र व राज्य सरकारला सुबुद्धी दे असे साकडे घातले. यावेळी त्यांनी मोदी सरकार व ठाकरे सरकार विरोधात जोरदार हल्लाबोल केला. पंढरपुरातील संत तनपुरे महाराज मठ येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीवरून केंद्र व राज्य सरकारला धारेवर धरले.
हेही वाचा - केंद्र व राज्य सरकार शेतकरीविरोधी.. महाआघाडी व भाजप नेत्यांना दिवाळी करू देणार नाही - राजू शेट्टी
'त्याच भाषेत उत्तर देणार'
देशामध्ये लखीमपूर शेतकरी हल्ला प्रकरणात शेतकरी संघटनेकडून देशव्यापी संप पुकारला आहे. त्यावेळी त्या संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनाही पाठिंबा देणार आहे. भरदिवसा शेतकर्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडले जात असेल तर ही काही मोगलाई नाही. अशाप्रकारे जर शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला, तर त्याचप्रमाणे उत्तर देण्याचा इशारा शेट्टी यांनी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला दिला आहे.