सोलापूर - आयुष्यात मोठेपण जर मिळवायचे असेल, तर खूप संघर्ष करावा लागतो. संघर्षाशिवाय यश मिळत नाही. याबाबत संत तुकाराम महाराज म्हणतात की, जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. मोठेपण मिळवायचे असेल तर तुम्हाला संघर्ष, अडी-अडचणींवर मात करावीच लागेल. असाच संघर्ष करुन एका शेतकऱ्याचा मुलगा तब्बल १० वर्षाच्या अथक परिश्रमानंतर चार्टड अकाऊटंट (CA) झाला आहे. सोपान हरिदास पासले (मु.पो. केवड, ता. माढा) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
सोपान पासले हा गेल्या १० वर्षापासून सीए ची तयारी करत होता. घरची परिस्थिती बेताची असताना त्याने अथक परिश्रम करुन यशाला गवसणी घातली आहे. सोपानचे प्राथमिक शिक्षण केवडच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण गावतीलच भैरवनाथ प्रशालेत झाले. त्यांनतर ११ वी आणि १२ वीचे शिक्षण बार्शीतील बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमधून झाले. त्यानंतर २००९ पासून सोपान पुणे येथे सीएची तयारी करत होता. त्याचे बीकॉम पुणे विद्यापीठातून झाले. २००९ ते २०१९ अशी १० वर्ष सोपानने सीए होण्यासाठी कष्ट केले आहेत. अखेर त्याला यामध्ये यश मिळाले.
सोपानची घरची परिस्थिती बेताचीच होती. आई वडील आणि भाऊ शेतकरी आहेत. मात्र, सोपनाच्या घरच्यांनी त्याला शिक्षणासाठी कधीही पैसा कमी पडू दिला नाही. सोपानच्या या यशाचा अतिशय आनंद झाला असल्याचे त्याच्या आई वडीलांसह भावाने सांगितले.
माझ्या यशामध्ये आई वडील आणि भाऊ यांचा खूप मोठा वाटा असल्याचे सोपानने सांगितले. तसेच पुण्यातील सीए परेश शहा, सीए शशिकांत वट्टमवार, सीए उल्हास मुळीक, सीए शरद चौधरी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचे सोपानने सांगितले. गेल्या १० वर्षापासून मी तयारी करत होतो. यामध्ये मला ८ वेळा अपयश आले आहे. तरीसुद्धा मी खचलो नाही. कारण मनात एकच ठरवले होते की, आपण यश मिळवायचेच. तसेच एक दिवस आपलाच असेल असे ठरवून न खचता अभ्यास केल्याचे सोपानने सांगितले. मलाही गणित आणि इंग्रजी या विषयांची भीती वाटत होती, मात्र, ज्या विषयाचा तिरस्कार केला, त्याच विषयांनी आज माझे आयुष्य बदलून टाकल्याचे सोपान म्हणाला. मी इयत्ता ११ वी ला असताना सीए होण्याचे ठरवले होते. तेव्हापासूनच मी त्यादृष्टीने प्रयत्न करत असल्याचे तो म्हणाला.
अशी केली सोपानने तयारी
१) १५ किंवा १६ तास अभ्यास करायची गरज नाही, दररोज ७ ते ८ तास अभ्यास पुरेसा आहे.
२) क्लासेसबरोबरच सेल्फ स्टडीवर भर दिला.
३) अभ्यासाचे योग्य नियोजन केले होते.
४) अभ्यासाबरोबरच लिखाणाचा सरावही केला होता.
५) मन प्रसन्न ठेऊन अभ्यास केला, कधीही दबाबात अभ्यास केला नाही.
६) कितीही अपयश आले तरी खचलो नाही
७) अभ्यासात सातत्य ठेवले.
८) वर्षातील ७ महिने सीए परेश शहा यांच्याकडे काम करायचे आणि ५ महिने परिक्षेला सुट्टी घ्यायचो.
९) सोशल मीडियाचा कमी वापर केला.
सीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संदेश
१) अभ्यासात सातत्य ठेवा
२) तुमचे शिक्षण जरी मराठी शालेत झाले असले तरी काही अडचण येत नाही.
३) यश मिळवलेल्या लोकांचे मार्गदर्शन घ्या.
४) ज्या मुलांना गणिताची आणि इंग्रजीची आवड आहे त्यांनी या क्षेत्रात यावे.
५) सेल्फ स्टडीवर जास्त भर द्या, झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा
६) कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेचा विद्यार्थी सीएची तयारी करु शकतो.
७) विशेष म्हणजे सीए ला वयाची अट नाही
८) पेशन्स ठेवा
या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी न खचता तयारी करायला हवी. तसेच विद्यार्थ्यांनी पेशन्स ठेवायला हवेत. या क्षेत्रात खूप साऱ्या संधी आहेत. तुम्ही सीए झाल्यावर स्वत:चे ऑफीस सुरु करु शकता, अथवा एखाद्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर संधी मिळू शकते. तसेच स्वत:चे क्लासेसही सुरु करु शकता असे सोपानने सांगितले. ज्याच्यात हार्ड वर्क करण्याची धमक आहे, तो या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो असेही सोपानने सांगितले.