सोलापूर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून ग्रामीण महाराष्ट्रातील मनसैनिकांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. शिवाय त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांकडून राज यांच्याशी थेट संपर्क होऊ दिला जात नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन काळात लाठ्या-काठ्या खाणाऱ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा आरोप करत मनसेचे उपप्रमुख किरण साठे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.
त्यांच्यासोबत आप्पासाहेब गाजरे, धनाजी पाटील, नवनाथ नन्नवरे यांनीही राजीनामे ई-मेलद्वारे राज ठाकरेंना पाठवले आहेत. किरण साठे यांनी सोलापूर जिल्ह्यात गेली ८ वर्षे मनसेचे काम केले. अकलूज या तत्कालीन राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात स्थानिक प्रश्नांवर आंदोलने, मोर्चे काढून त्यांनी अनेक खटलेही अंगावर घेतले आहेत. अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यात मनसेचे दोन गट पडले आहेत. या दोन गटातील चढाओढीत खरा मनसैनिक भरडला गेला आहे आणि त्यामुळे पक्षाला उतरती कळा लागली आहे.
पक्षात जिल्हास्तरावर एकाधिकारशाही सुरु झाली. नेमकी हीच व्यथा मांडण्यासाठी आणि स्थानिक राजकारणातून मिळालेल्या धमकीचे गाऱ्हाणे राज ठाकरे यांच्या कानावर घालण्यासाठी वारंवार वेळ मागितला. पण राज यांच्या भोवताली असलेल्या लोकांनी आपल्याला त्यांच्याशी भेटू दिल नाही. त्यामुळे आपण आता पक्ष सोडत आहे. जी परिस्थिती सोलापूरची आहे, तिच व्यथा उभ्या महाराष्ट्रातील मनसैनिकांची असल्याचेही किरण साठे यांनी सांगितले.
अर्थात, किरण साठे सारख्या छोट्या कार्यकर्त्यांच्या जाण्यामुळे राज ठाकरे यांना किती फरक पडतो, हा प्रश्न वेगळा. पण किरण जाताना आपल्यासोबत उरल्या-सुरल्या मनसेच्या वाहतूक, शेतकरी आघाडीचे पदाधिकारी, तालुका उपाध्यक्ष यांनासोबत घेऊन पक्षाची साथ सोडत आहे. यावरून आता वारे उलट्या दिशेने वाहत आहे, हे मात्र नक्की.