सोलापूर - आरोपीला रिंमाड न देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. वैराग पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक महेश पवार असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. ६० हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली.
वैराग पोलीस ठाण्यातील एका प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला रिमांड न देण्यासाठी महेश पवार याने ६० हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी अजित जाधव आणि त्यांच्या पथकाने पोलीस स्टेशनच्या आवारातच लाच घेणाऱ्या पोलिसाला रंगेहात पकडले.
तक्रारदाराच्या नातेवाईकाविरुद्ध वैराग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलीस कोठडी वाढवून न घेण्यासाठी तसेच त्यांना गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पोलीस नाईक महेश सतीश पवार याने लाचेची मागणी केली होती.
ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अजितकुमार जाधव, कविता मुसळे, पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलकंठ जाधवर, चंद्रकांत पवार, पो शिपाई सिद्धाराम देशमुख, प्रफुल्ल जानराव, चालक शाम सुरवसे यांनी केली.