सोलापूर- नऊशे वर्षांची परंपरा असलेल्या सोलापूरच्या शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला आज (सोमवारी) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. शहरातील 68 शिवलिंगांना तैलाभिषेक केल्यानंतर मानाच्या 7 नंदीध्वजांची मिरवणूक काढण्यात आली. पाच दिवसांच्या या यात्रेत नंदीध्वजांच्या काठ्या, तैलाभिषेकाची साधने आणि बाराबंदीच्या वेशातील भक्तगणांचा हा सोहळा अत्यंत देखणा असतो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित लावली.
आज सकाळी 8 वाजता बाळीवेशीतील हिरेहब्बू वाड्यातून ही मिरवणूक बाबा कादरी मशीद, दाते गणपती, दत्त चौक, सोन्या मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, पंचकट्टामार्गे दुपारी 1 वाजता सिद्धेश्वर मंदिरात पोहोचली.... मिरवणूक मंदिरात पोहोचल्यानंतर मानकर्यांना विडे देणे व सिद्धरामेश्वरांच्या गदगीची पूजा करण्यात आली. मंदिरातील धार्मिक विधीनंतर ही मिरवणूक 68 लिंगांच्या तैलाभिषेकासाठी मार्गस्थ झाली. ही मिरवणूक रात्री 10 वाजता हिरेहब्बू वाडा येथे विसजिर्त होणार आहे. बाराबंदीचा या देखण्या सोहळ्यात जो तो स्वयंस्फूर्तीने, उत्साहाने या सहभागी झालेला असतो. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेदेखील एका सामान्य भक्ताच्या भावनेतून सहकुंटुंब या यात्रोत्सोवात सहभागी झाले होते.
उद्या यात्रेचा मानाचा अक्षता सोहळा रंगणार असून या अक्षता सोहळ्यासाठी मानाचे सातही नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यापासून निघतील. दुपारी 1 वाजता मंदिरात पोहोचल्यानंतर संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा होईल. सिद्धेश्वरांच्या या यात्रेनिमित्त समस्त सोलापूरकर घराला तोरणे बांधून यात्रा साजरी करतात. जवळपास 12 दिवस येथील गड्डा यात्रा सुरू राहते. यामध्ये सक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी शोभेची दारूची नयनरम्य आतषबाजी केली जाते. या गड्डा यात्रेला सोलापूर शहरासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.