सोलापूर - सोलापुरात खवले नसलेला नाग आढळून आला आहे. मंगळवारी (24 ऑगस्ट) रोजी सायंकाळच्या सुमारास मध्य रेल्वेच्या कार्यालयासमोर गेटमध्ये हा नाग आढळून आला आहे. मध्य रेल्वेचे कर्मचारी संदीप पैकेकरी यांना हा नाग दिसला. संदीप यांनी सापाला सुरक्षितपणे पकडले. बंदीस्थ केलेल्या सापाची ओळख पटत नसल्याने त्या सापाचे फोटो काढून सर्पमित्र रोहन तोडकरी आणि संतोष धाकपाडे यांना ते पाठविले. सापाबद्दल माहिती जाणून घेतली. वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूरच्या सदस्यांनी त्या सापाचे नीट निरीक्षण करून पाहिले असता तो साप नाग प्रजातीचा असल्याचे समजले.
'जेनेटिक डिसोऑर्डरमुळे क्वचितच असे साप असतात'
या सापाचे फोटो वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशनच्या सदस्यांनी सर्प अभ्यासक वरद गिरी यांना पाठविले. सापाबद्दल माहिती घेतली. काही ठराविक सापांच्या शरीरावर खवलेच तयार होत नसतात. अशा सापांच्या अंगावर त्वचा असते परंतु खवले नसतात. अशा घटना खूप दुर्मिळ असतात. जेनेटिक डिसोऑर्डरमुळे अशा घटना शंभरातून एखाद्या सापांमध्ये घडतात, असे वरद गिरी यांनी सांगितले. याबाबतची माहिती वनविभागाचे उप वनसंरक्षक धैर्यशील पाटील यांना देऊन त्या सापाची नोंद वनविभागाकडे करण्यात आली. या सापाला मध्य रेल्वे ऑफिस जवळच असलेल्या मोकळ्या जागेत व झुडपात सोडून देण्यात आले. यावेळी वनरक्षक विशेष सेवा, सोलापूरचे श्रीशैल पाटील, वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशनचे अजित चौहान, संतोष धाकपाडे, सुरेश क्षीरसागर, सोमानंद डोके, मयांक चव्हाण, रोहन तोडकरी, संदीप पैकेकरी, निरंजन मोरे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - ती आली... तिने बघितले... ती उधळली... पुण्यात म्हैस उधळून दुचाकीवरील पती-पत्नी जखमी, घटना CCTVमध्ये कैद