पंढरपूर - ग्लोबल टिचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांनी कोरोना टेस्ट केली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती डिसले यांनी दिली आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मुंबईहून गावी परतल्यानंतर रणजितसिंह डिसले यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्यांनी आपली कोरोना चाचणी केली. यामध्ये त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कुटुंबातील इतर व्यक्तीचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे.
तब्बल ७ कोटी रुपयांचा ग्लोबल टिचर अवॉर्ड जिंकणारे बार्शीतील झेडपी शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. त्यानिमित्ताने अनेक जण त्यांना भेटले आहेत. यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री दत्ता भरणे, आ.सुभाष देशमुख,आ.राजेंद्र राऊत यांच्यासह अनेक दिगज्जांच्या संपर्कात ते आल्याने, चिंता व्यक्त केली जात आहे.