सोलापूर- आषाढी वारीसाठी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांचे पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी पोलिसांना रेनकोट वाटप करण्यात आले आहेत. उद्योजक राम रेड्डी आणि हिंदूस्थान पेट्रोलियम कंपनी यांच्या वतीने हे रेनकोट वाटप करण्यात आले आहे.
12 जूलैला पंढरपुरात आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडत आहे. आषाढी वारीच्या काळात 10 ते 12 लाख वारकरी पंढरपुरात येत असतात. वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेला सुसज्ज रहावे लागते. त्यामुळे या काळात सुरक्षेसाठी सोलापूर पोलीस दलासोबतच राज्यातून पोलीस कर्मचारी आणि अधिकारी पंढरपूर येथे येत असतात.
पावसाळा असल्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे पावसापासून संरक्षण व्हावे, म्हणून रेनकोटचे वाटप करण्यात आले. सोलापूरातील उद्योजक राम रेड्डी यांनी 250 रेनकोट आणि हिंदूस्थान पेट्रोलियम कंपनीकडून 100 रेनकोट दिले आहेत.
उद्योजक राम रेड्डी, हिंदूस्थान पेट्रोलियम कंपनीचे व्यवस्थापक गजेंद्र सुनहरे, सोलापूरचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते रनेकोटचे पोलिसांना वाटप करण्यात आले.