सोलापूर - माढा शहराच्या परिसरात औद्योगिक वसाहत उभारण्यात यावी या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. औद्योगिक वसाहत सुरू व्हावी, यासाठी माढाकरांनी लोकचळवळ उभारली असून त्या माध्यमातून एमआयडीसीसाठी लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून माढा शहरात सह्या करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
माढा शहर व परिसरातील गावांच्या विकासाच्या दृष्टीने, तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे, याकरिता माढा व उपळाई(बुद्रुक) गावाच्या परिसरात एमआयडीसी व्हावी, अशी शहरातील लोकांची मागणी आहे. एमआयडीसी स्थापनेकरिता मंजुरी मिळावी, यासाठी माढ्या लोकांनी लोकचळवळ सुरू केली आहे. चळवळीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यासाठी माढा शहरातील नागरिक एकवटले आहेत.
एमआयडीसी प्रश्नानावर काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून औद्योगिक विकास केंद्र संघर्ष समितीची स्थापना
एमआयडीसीच्या प्रश्नावर काँग्रेस (आय) पक्षाचे तालुका उपाध्यक्ष जहीर मणेर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे अध्यक्ष दिनेश गाडेकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी व्यापारी व नागरिक तरुणांची बैठक घेऊन औद्योगिक विकास केंद्र संघर्ष समिती स्थापन केली आहे. या संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांनी लढा सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात पहिल्या दिवशी जवळपास दोन हजार लोकांनी सह्या करून एमआयडीसीसाठी होणाऱ्या लढ्याला पाठबळ दिले आहे.
माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड. मीनल साठे यांच्यासह माजी जि.प.सदस्य झुंजार भांगे, अजिनाथ माळी, गुरुराज कानडे, यासह शहरातील सर्वपक्षीय अन्य नेते मंडळीसह सामाजिक संघटनाच्या सदस्यांनी, तरुण, नागरिकांनी सह्या करुन मोहिमेस प्रतिसाद दिला. लढ्याला पाठींबा दर्शवून या पुढील सर्व लढ्यात सक्रिय राहणार असल्याची देखील नागरिकांनी ग्वाही दिली.
जहीर मणेर व दिनेश गाडेकर यानी प्रास्ताविकेतून एमआयडीसी उभारणीची गरज का आहे? याबाबत माहिती दिली. माढा शहरासह उपळाई परिसरात घरोघरी व बाजारपेठेत जाऊन सह्या घेतल्या जाणार आहेत. सह्यांच्या प्रती व निवेदन घेऊन मुख्यमंत्री तसेच उद्योग मंत्र्याना शिष्टमंडळ भेटणार आहे. त्यानंतर आंदोलनाचे शस्र हाती घेतले जाणार आहे. माढा व उपळाई परिसरातील वन विभागाच्या माळरान जमिनीच्या ठिकाणी एमआयडीसी उभारणीसाठी आवश्यक ती जागा आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यास रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे जहीर मणेर व दिनेश गाडेकर यानी सांगितले आहे.
बेरोजगारीमुळे माढा भागात बेरोजगारी व स्थालांतराची समस्या
एमआयडीसी माढा भागात कोणताही मोठा उद्योग उभा नसल्याने बेरोजगारांचे प्रमाण जास्त आहे. तसेच या भागातील नागरिकांचे स्थलांतराचे प्रमाण वाढत आहे. माढा तसेच उपळाई (बुद्रुक) गावाच्या दरम्यान माळरान व पडीक जमिनीचे प्रमाण जास्त आहे. या ठिकाणी कृषी उत्पन्न अत्यल्प स्वरुपाचे आहे. या भागातील क्षेत्राचा अभ्यास केल्यास सदर भागातील जवळपास ७०० ते ८०० एकर क्षेत्र हे वनविभागाचे आहे. एमआयडीसी केंद्राची स्थापना केल्यास या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे. यंदाच्या निवडणुकीत आमदार बबनराव शिंदे यांनी माढ्यात एमआयडीसी उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.