सोलापूर - अल्पवयीन मूकबधिर मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. ती गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी, मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. या आरोपीची 17 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
काय आहे घटना?
मोहोळ पोलिसांनी व पोलीस उपधीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात एक कुटूंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. त्या कुटुंबामध्ये एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आहे. ही मुलगी मूक बधिर आहे. या कुटुंबातील इतर व्यक्ती मोलमजुरी करण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर ती मुलगी घरी एकटीच राहत होती. तिच्या मतिमंदपणाचा 1 जून ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने फायदा उचलला आणि तिच्याशी राहत्या घराच्या परिसरात दुष्कृत्य केले. त्यातून संबंधित पीडित मुलगी गरोदर राहिली.
हेही वाचा - व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन, अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक
..अन् पीडिता गरोदर राहिल्याची माहिती आली समोर -
पीडित मुलगी घरात व्यवस्थित जेवण करत नाही म्हणून तिच्या कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. यावेळी तेथील डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या कुटुंबीयांनी तिला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले आहे. प्रकरण गंभीर होत असल्याने पोलिसांनी शासकीय रुग्णालयात बंदोबस्त वाढविला आहे.
मजुरीकरिता व कामानिमित्त घराबाहेर असताना अल्पवयीन मूक बधिर मुलगी घरी एकटीच असताना कोणीतरी संबंधित नराधमाने तिच्या एकटेपणाचा व तिच्या मुकबधिरपणाचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. त्यामुळे ती गरोदर राहिली आहे, अशा आशयाची फिर्याद पीडित मुलीच्या भावाने मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याबाबत संबंधित नराधमा विरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.