सोलापूर - उजनी धरणाच्या जलाशयावर हिरव्या रंगाचा तवंग जमा झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, पाण्याला दुर्गंधीही सुटली आहे. आतापर्यंत अनेक देशी - विदेशी संशोधकांनी या पाण्याचे संशोधन करुन हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे सांगितले आहे. तरीदेखील या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात आहे. परंतु, प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष आहे.
यावर्षी उन्हाळ्यामध्ये उजनी जलाशयाचा पाणीसाठा ऐतिहासिक अशा वजा ५९ टक्क्यांवर पोहोचला होता. परंतु, पावसाळ्यात पुणे जिल्हा परिसरात तसेच भिमा खोऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे जलाशयाचा पाणीसाठा १११ टक्क्यांच्या पुढे गेल्याने उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
धरणाच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने जलाशयावर मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना त्रास होऊ लागला आहे. तसेच, पाण्याच्या संपर्कात येताच अंगाला खाज सुटण्याचा प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे जलाशयावरून सुरु असलेल्या बहुसंख्य सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांद्वारे हेच प्रदूषित पाणी थेट पिण्यासाठी वापरले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढूनही याकडे शासनाचे किंवा प्रदूषण मंडळाचे अजिबात लक्ष नाही.
उजनी जलाशयात पुणे जिल्हा परिसरातील मैला,सांडपाणी तसेच रासायनिक कारखान्यातील निरुपयोगी टाकाऊ रासायनिक पदार्थ मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाण्याबरोबर येत असतात. यामुळे प्रदूषणात वरचेवर वाढ होत आहे. या प्रदूषणामुळे जलाशयातील वनस्पती, तसेच इतर जलचरांवरही परिणाम होत आहे. सध्या जलाशयात मुबलक प्रमाणात पाणी वाढून मच्छीमारांच्या जाळ्यात मासे सापडण्याचे प्रमाण कमी
झाले आहे.त्यातच वाढत्या प्रदूषणामुळे माशांच्या अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
उजनीचे सोलापूर जिल्ह्याचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या डिकसळ पुल,भिगवन,डाळज,पडस्थळ,आजोती,कांदलगाव (ता.इंदापूर) कोंढार चिंचोली,खादगाव,रामवाडी,टाकळी,पोमलवाडी,केत्तुर एक,केत्तुर दोन, वाशिंबे,गोयेगाव,सोगाव,उमरड आदी ठिकाणी जलाशयाच्या पाण्यावर हिरवा रंग आलेला दिसून येत आहे.