सोलापूर : अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर येथे देवदर्शन घेण्यासाठी पत्नी व दोन मुलांसह नाना पटोले सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापुरातील पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवरमध्ये आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टी घेऊन सातारा येथे मुक्कामी आहेत, याबाबत नाना पाटोले यांना प्रश्न विचारताच त्यांनी वेगळ्या उदाहरणांसह उत्तर दिले.
राज्य सरकारवर टीका : राज्यात वेगवान सरकार आहे, असे म्हणणारे बेरोजगारीवर काहीही बोलत नाहीत. मुंबईत पोलीस भरतीसाठी जवळपास 48 हजार अर्ज आले आहेत. त्या अर्जाची छाननी करण्याची जबाबदारी सरकारने खाजगी कंपन्यांना दिलेली आहे. पोलीस भरतीसाठी पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी अर्ज करत आहेत. यावरून हे कळते की राज्यात किती बेरोजगारी आहे. वेगवेगळ्या घोषणा करणारे सरकार आणि वेगवान सरकार आराम करणारच ना, असे नाना पटोले यांनी माध्यमांसमोर बोलताना राज्य सरकारवर टीका केली.
भ्रष्टाचाराचे पैसे मोजण्यासाठी सुट्टी घेतली : राज्यात जनतेचे अनेक प्रश्न आहेत. मात्र, सरकार हे प्रश्न सोडवण्याऐवजी जनतेची पैसे लूट करण्याचे काम करत आहे. याचे एक उदाहरण नाना पटोलेंनी दिले. काही दिवसांपूर्वी सरकारने एक टेंडर काढले. शेतमाल विकत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यासाठी सुतळी लागते. त्यासाठी दोन कोटी लागत होते. परंतु सरकारने 35 कोटी रुपयांची खरेदी दाखवली म्हणजे दोन कोटींसाठी 35 कोटींचा भ्रष्टाचार केला. राज्यातील जनतेच्या घामाचे पैसे लुटले जात आहेत. हे भ्रष्टाचाराचे पैसे मोजण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुट्टी घेतली आहे, अशी नाना पटोलेंनी टीका केली.
हेही वाचा :
Congress Meeting : लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीनंतर राज्य दौरा करणार - नाना पटोले