सोलापूर - कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असला तरी निसर्गाने मात्र या मानवी निर्बधांचा लवलेशही प्रदर्शित न करता मानवी अनुपस्थितीचा जल्लोशच केलेला दिसतो आहे. उजनीच्या पाणवठ्यावर हे प्रकर्षाने जाणवत आहे. उजनी धरण परिसर हे देशी परदेशी पक्षांचे नंदनवन समजले जाते. या ठिकाणी थंडीच्या हंगामात अनेक परदेशी पक्षी येत असतात. देशी व स्थानिक पक्षांची संख्यासुद्धा मोठी आहे. यावर्षी झालेला भरपूर पाउस आणि उजनीमध्ये पक्षांसाठी अत्यंत पुरक अशा प्रकारचे वातावरण होते.
![उजनीवर पक्षांचा मुक्तसंचार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sol-karamala-02-ujanipakshimuktvihar-mhc10005_29042020090827_2904f_1588131507_859.jpg)
सुमारे तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून असलेल्या लॉकडाऊनमुळे नदी पात्रात माणसांची वर्दळ अजिबात नाही. मासळी बाजार बंद असल्याने मासेमारी बंद आहे आणि पक्षी पर्यटनसुद्धा बंद आहे. माणसांचा संपर्क नदीपात्रात अत्यंत कमी असल्याने पक्षांना मोकळीक मिळाली आहे. बाहेरून येणार्या पक्षांचीही अद्याप मोठ्या संख्येने रेलचेल आहे. यामध्ये फ्लेमिंगो, चक्रवाक बदक, नदीसुरय, कुरकीरा, उघड्या चोच्याचा करकोचा (आसाम) आदि पक्षी मोठ्या संख्येने आहेत.
![उजनीवर पक्षांचा मुक्तविहार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sol-karamala-02-ujanipakshimuktvihar-mhc10005_29042020090827_2904f_1588131507_788.jpg)
यावर्षी फ्लेमिंगो सुमारे हजारांच्या थव्याने फिरताना दिसत आहे. चंबळच्या खोर्यातून येणार्या नदीसुरय आणि कुरकीराया पक्षांनी आता अंडी उबवून त्यातून छोटी पिल्ले बाहेर आली आहेत. आसामवरुन येणार्या उघड्या चोचीचा करकोचा अद्यापही मोठ्या संख्येने दिसतो आहे. सिगल पक्षांचे तीन ते चार प्रकार याठिकाणी पहायला मिळतात. त्यांची संख्याही भरपूर आहे. करड्या, पांढर्या अशा विविध रंगाचे-आकाराचे बगळे, चित्रबलाक, करड्या रंगाचा करकोचा, वकील, वंचक, शराटी किंवा कुदळ्या, वारकरी बदक आदि प्रकारचे स्थानिक पक्षी उजनी धरणपात्रात मुक्तपणे बागडत आहेत.
![लॉकडाऊनमुळे निसर्ग सुखावला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sol-karamala-02-ujanipakshimuktvihar-mhc10005_29042020090827_2904f_1588131507_308.jpg)
माणसांचा लॉकडऊन पक्षांसाठी मात्र मोकळीकीचा काळ ठरला आहे. मासेमारी बंद असल्याने पक्षांसाठी मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध आहे. कोणत्याही भिती व वर्दळीशिवाय पक्षांची मुक्तशाळा नदीकाठी भरत आहे. माणसाचा हस्तक्षेप नाही अशी जागा किंवा कोणतेही ठिकाण नाही अशी स्थिती असताना लॉकडाऊनमुळे माणसाचा निसर्गातील अनावश्यक हस्तक्षेप नाईलाजाने का होईना थांबला असल्याने याचा पक्षी आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येईल.
![लॉकडाऊनमुळे निसर्ग सुखावला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sol-karamala-02-ujanipakshimuktvihar-mhc10005_29042020090827_2904f_1588131507_358.jpg)
पक्षांची मानवाबद्दलची भीती नाहीशी झाल्याने जलाशयातील पाणपक्षी, चिखल पक्षी निर्भयपणे मुबलक उपलब्ध होणाऱ्या अन्नावर मनमुराद ताव मारत आहेत. भीमा नदीच्या पाणी प्रदुषण पातळीतही घट झाल्याचे जाणवत आहे. यामुळे त्यांचे आरोग्यही चांगले होऊन त्यांची पुढील पिढी सुदृढ होण्यासाठी फायदा होईल. असे पक्षीप्रेमी फोटोग्राफर कल्याणराव साळुंखे यांचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमुळे माणूस घरात कैद झाला असला तरी उजनी धरण परिसरात पक्षांचा मुक्त वावर दिसून येत आहे.