सोलापूर - शेतकऱ्यांच्या मुलांसाठी असलेल्या वसतीगृहाचा लिलाव करण्याची अजब प्रक्रिया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेत असताना राहण्याची कोणतीही अडचण येऊ नये, या उदात्त हेतूने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेले वसतिगृह हे विद्यमान संचालक मंडळाने लिलावात काढले आणि शेतकरी हिताला तिलांजली देत व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचा प्रकार सुरू केला आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना सोलापूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये शिक्षण घेत असताना रहाण्याची व्यवस्था व्हावी, या उदात्त हेतूने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र, सध्याच्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ आणि प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी असलेले हे वसतिगृह लिलावात काढण्याचा घाट घातला असून वसतिगृहाची लिलाव प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या मुलांसाठीचे असलेले वसतिगृह लिलावात करण्याचा निर्णय घेतला असल्याची अधिकृत माहिती बाजार समितीचे शासन नियुक्त सचिव मोहनराव निंबाळकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - करमाळ्यात 24 लाखांचा गुटखा जप्त; करमाळा पोलिसांची कारवाई
सोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर शहराला लागूनच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवार आहे. बाजार समितीच्या आवारातच सोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गालगत 2002 साली वसतिगृह सुरू करण्यात आले.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठींचे हे वसतीगृह काही काळ चांगल्या पद्धतीने चालले. मात्र, नंतरच्या काळात बाजार समितीकडून या वसतीगृहाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तसेच वसतीगृहाची दुरावस्था झाल्यामुळे हे वसतीगृह बंद पडले. वसतिगृह व्यवस्थित करून चालू करणे अपेक्षित होते. मात्र, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून संचालक मंडळात काम करणाऱ्या संचालकांनी व प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी असलेले वसतीगृह लिलावात काढण्याच्या निर्णय घेतला.
वसतीगृहाचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी बाजार समितीमध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून काम करणारे श्रीमंत बंडगर यांनी या लिलावाला विरोध केला होता. मात्र, तज्ज्ञ संचालक असल्यामुळे त्यांनी केलेल्या विरोधाची कोणतीही दखल न घेता विद्यमान संचालक मंडळाने व प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी असलेल्या वसतीगृहाची लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा आरोप श्रीमंत बंडगर यांनी केला आहे.
हेही वाचा - सोलापूरमध्ये पावसाची जोरदार हजेरी; झाड कोसळून 2 घरांचे नुकसान, जीवितहानी नाही
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्षानुवर्षे काँग्रेस निगडीत असलेल्या नेत्यांचीच सत्ता राहिलेली आहे. मात्र, बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद हे भाजपच्या ताब्यात आले आहे. सोलापूरचे पालकमंत्री असलेले विजयकुमार देशमुख हेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती म्हणून काम पाहत आहेत. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख सभापती असताना शेतकऱ्यांच्या मुलांसाठी असलेले वस्तीगृह लिलावात काढण्याचा दुर्दैवी निर्णय घेण्यात आला आहे.