सोलापूर - पंढरपूर, माळशिरस, अकलूज आदी भागात अतिवृष्टी झाल्याने अनेक नाले, ओढे तुडुंब भरुन वाहत आहेत. नद्या व ओढ्यावरील पुलावरुन पाणी वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कोळेगाव येथील पुलावरुन वाहून जाणाऱ्या एका वृद्ध दुचाकीस्वारास होमगार्ड जवानांनी वाचविले आहे. होमगार्ड पथकातील आकाश महानवर, जयदेव शिंदे व शरीफ सय्यद यांनी त्या वृद्धाचे प्राण वाचविले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 18 सप्टें.) संध्याकाळी घडली.
ग्रामीण पोलीस दल पंढपूर, माळशिरस, अकलूज आदी भागातील ओढे व नद्यांवरील पुलांवर विशेष लक्ष देऊन आहे. सर्व नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. पंढरपूर-पुणे, पंढपूर-सातारा हे मार्ग पूर आल्यामुळे बंद झाले आहेत. तर माळशिरस तालुक्यातील मळोली गावावर महापुराचे मोठे संकट आले आहेत. अनेक जणांचे संसारोपयोगी साहित्य या पुरात वाहून गेले आहे.
शुक्रवारी सायंकाळी अकलूज येथील कोळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओढे भरुन वाहत होते. पाणी पुलावरुन वाहत असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. अकलूजकडे जाणाऱ्या एका वृद्धाने घाईगडबडीत आपली दुचाकी घेत पुलावरुन प्रवास सुरु केला. पाण्याचा वेग अधिक असल्याने त्या वृद्धाचे नियंत्रण दुचाकीवरील सुटले. तरी देखील त्याने दुचाकी वाहन पुलाच्या व पाण्याच्या मधोमध थांबविले. पण, पुलावरुन वाहणाऱ्या पाण्या प्रवाह अधिक असल्याने वृद्ध पाण्यासोबत वाहून जाऊ लागला. त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षक होमगार्डनी पुलावर जाऊन नागरिकांच्या मदतीने मानवी साखळी बनविली व त्या वृद्ध दुचाकीस्वारास मदतीचा हात दिला. साखळीच्या माध्यमातून त्याला वाचविले.
हेही वाचा - सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू