सोलापूर - पर्यावरण संरक्षणासाठी राज्य सरकारने यावर्षी ३३ कोटी झाडे लावण्याचा निरधार केला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सिध्देश्वर वनविहार येथे आज पालकमंत्री विजय देशमुख यांनी वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी लोकांना ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश दिला आहे.
सोलापूर शहरातील सिध्देश्वर वनविहार येथे वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला सहकार मंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी. व्ही. घुटे, उपवनसंरक्षक प्रवीणकुमार बडगे, विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री देशमुख म्हणाले कि, झाडे केवळ लावू नका, तर ती नीट वाढवा. त्याची मुलाप्रमाणे काळजी घ्या. कारण आपले जीवन नीट ठेवण्यासाठी झाडांची गरज आहे. राज्य शासनाचे यंदा ३३ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी सर्व यंत्रणानी काम करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन देशमुख यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले कि, प्रत्येक नागरिकांनी आपल्या आयुष्यात किमान पाच झाडे लावायला हवीत. सोलापूर जिल्ह्यात झाडे लावण्याची गरज आहे. झाडे लावण्याच्या अभियानात विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी वृक्षारोपन केले. या कार्यक्रमाप्रसंगी सुयश गुरुकुल शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.