सोलापूर - शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणू महामारीने थैमान घातले आहे. पण, सर्व प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी पंढरपूर निवडणुकीत व्यस्त असल्याने आणि आचारसंहिता असल्याने कोरोना महामारीवर राजकारण करता आले नाही. आज नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीनंतर देखील पालकमंत्री दत्ता भरणे यांनी प्रसार माध्यमांसमोर कोरोना महामारीबाबत बोलण्यास टाळले आणि आचारसंहितेचे कारण समोर केले. महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी बैठक झाली, पण त्याबद्दल सविस्तर माहिती जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त देतील, असे सांगून पालकमंत्र्यांनी काढता पाय घेतला.
हेही वाचा - रेमडेसिवीरसाठी महिला रडत पोहोचली नियोजन भवनात; इंजेक्शन वाटपाचा भोंगळ कारभार
वाढत्या कोरोना महामारीमुळे लोकप्रतिनिधीवर सोशल मीडियावरून टीका
सोलापुरात 5 एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हळूहळू सर्व व्यवहार बंद करण्यात आले आणि आता पूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण, या काळात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दररोज 800 ते 1 हजार 500 इतके कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे, सोलापूरच्या जनतेने निवडून दिलेले आमदार, खासदार कुठे गायब आहेत, अशी टीका सोशल मीडियातून केली जात आहे. सोलापुरात कोरोना रुग्णवाढीचा दर भरपूर वाढला आहे आणि मृत्यूदर देखील भयंकर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत स्थानिक लोकप्रतिनिधी देखील असणे आवश्यक असताना आचारसंहितेचे कारण समोर करून राजकीय नेत्यांनी घरात राहणे पसंद केले आहे.
27 मार्च नंतर पालकमंत्र्यांनी घेतली सोलापुरात अधिकाऱ्यांसोबत बैठक
पालकमंत्री दत्ता भरणे यांनी सोलापुरातील अधिकाऱ्यांसोबत आज दुपारी बैठक घेतली. माध्यमांसोबत त्यांनी बोलणे टाळले आणि कोरोना महामारी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांसोबत बैठक झाली असून अधिकृत माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घ्या, अशी विनंती करत पालकमंत्र्यांनी नियोजन भवन येथून काढता पाय घेतला. 27 मार्च नंतर सोलापुरातील अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांचे दर्शन झाले, अशीही चर्चा सुरू होती.
हेही वाचा - मर्यादित स्वरूपात साजरी होणार पंढरपूरची चैत्र यात्रा