सोलापूर - मोहिते पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे अगोदर द्यावेत नंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घ्यावी. अन्यथा मोदी यांना सभेत काळे झेंडे दाखवू, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील घाटणेकर यांनी दिला आहे. ते आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
आम्ही २०१४ च्या निवडणुकीत भाजप पक्षासोबत होतो. त्यावेळी त्यांनी उत्पादन खर्च अधिक ५० टक्के शेतमालाला हमीभाव, तसेच संपूर्ण कर्ज माफीचे अश्वासन दिले होते. मात्र, गेल्या ५ वर्षांत हे आश्वासन अधुरेच राहिले. उलट या सरकारच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला. त्यामुळे या सरकाला आणि पंतप्रधानांना शेतकऱ्याकडे मतांचे दान मागण्याचा काहीही नैतिक अधिकार राहिलेला नाही. असे घाटणेकर म्हणाले.
हे सरकार शेतकरी विरोधी असून त्यांनी गेल्या ५ वर्षांत शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे. सध्या राज्याच्या अनेक भागात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने या परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याबरोबर मजुरांच्या रोजगाराच्या प्रश्नावर साधा दिलासा दिलेला नाही. तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बिगर शेती कर्ज थकवलेले आहे. त्यांच्या पतसंस्थांतील ठेवीदारांचे पैसे दिले नाहीत. अगोदरच दुष्काळाच्या झळांनी हैराण झालेल्या शेतकऱयांचे पैसे पंतप्रधान मोदीच्या सभेपूर्वी द्यावेत. अन्यथा या सभेत पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवून बळीराजा शेतकरी संघटना याचा निषेध करणार असल्याचे, घाटणेकर यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १७ एप्रिलला अकलुज येथे सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमिवर बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. मोहिते पाटील यांच्या विजय शुगर आणि शंकर सहकारी कारखान्याने ऊस उत्पादकांचे पैसे थकविले आहेत. ते पैसे मोहिते पाटलांनी सभेपूर्वी शेतकऱ्यांना देण्यात यावे. अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केली आहे. मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मोदी आता 'चौकीदार चोरांचे रखवालदार' झाले आहेत. अशी अप्रत्यक्ष टीका घाटणेकर यांनी मोहिते पाटलांचे नाव न घेता केली आहे.