पंढरपूर - एकीकडे केंद्र सरकारकडून लागू केलेली कांदा निर्यात बंदी तर दुसरीकडे खराब हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. यासंदर्भात आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी शेतकरी पुत्रांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली. मात्र, ती न मिळाल्याने त्यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले.
बार्शी तालुक्यातील विरेश आंधळकर या युवा शेतकऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मुले पंकज चिवटे व निखिल सातपुतेही उपस्थित होते. त्यांनी पंढरपूर येथे खासदार पवार यांची भेट घेत कांदा उत्पादकांच्या अडचणी मांडल्या. पवार यांनी त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेत सरकार दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
'मी विरेश आंधळकर सौंदरे (बार्शी, सोलापूर) गावचा रहिवासी आहे. मी एक पदवीधर असून माझी वडिलोपार्जित शेती आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटामध्ये मला गावी परतावे लागले. ही केवळ माझी एकट्याची परिस्थिती नसून शहरामध्ये काम करणाऱ्या व शिकणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांच्या मुलांना आता गावाकडे परतावे लागले आहे. त्यामुळे आता वडिलोपार्जित शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना काम करून उत्पन्न काढण्यासाठी जिवाचे रान करावे लागत आहे. या सर्व परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी आपली भेट होणे अत्यंत गरजेचे आहे. तरी, कृपया इतरांप्रमाणे आपण आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना देखील भेटण्यास वेळ द्यावा, अशी विनंती विरेश आंधळकर याने राज्यपालांकडे केली होती,' असे या युवा शेतकऱ्याने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. मात्र, राज्यपाल भवनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने विरेश यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
हेही वाचा - कृषी विधेयकाविरोधात काँग्रेस आक्रमक तर शिवसेना-राष्ट्रवादीची भूमिका अस्पष्ट
नैसर्गिक संकट, केंद्र सरकारकडून करण्यात आलेली कांदा निर्यात बंदी यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांची मुले म्हणून आम्ही यासंदर्भात शासन दरबारी आवाज उठवण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला यश येताना दिसत आहे. आज माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पंढरपूर येथे भेट घेऊन निवेदन देत सविस्तर चर्चा झाली. शरद पवारांनी देखील दखल घेत पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याचे विरेश यांनी सांगितले.
दरम्यान, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना या शेतकरी पुत्रांना भेटीसाठी वेळ द्यावी, अशी विनंती केली होती. रोहित यांनी ट्विट करत 'महामहीम राज्यपाल महोदय हे नागरिकांच्या हक्कांप्रती अत्यंत संवेदनशील आहेत. आजवर त्यांनी कलाकार,विरोधी पक्षाचे नेते यांचं म्हणणं ऐकून घेत सरकारला योग्य ते निर्देश दिलेत. आपण अन्नदाता व पत्रकार असल्याने राज्यपाल महोदय आपल्यालाही निश्चित वेळ देऊन आपली समस्या जाणून घेतील,' असा विश्वास असल्याचे आमदार रोहित यांनी म्हटले होते.
हेही वाचा - स्वाभिमानीची ऊस परिषद नोव्हेंबरमध्ये? राजू शेट्टींनी सरकारला दिला 'हा' इशारा