सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनमुळे माढ्यातील शहाजी चवरे या शेतकऱ्याने अडीच एकर क्षेत्रातील कलिंगडचे मोफत वाटप करुन जगाच्या पोशिंद्याकडे दान असल्याचे दाखवून दिले. दरम्यान, चवरे यांचे कलिंगड पिकाने ४ लाखांचे नुकसान केले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यभरात संचारबदी जाहिर झाली आणि बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले. या लॉक डाऊनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतमालाचे दर ढासळले गेले. लॉक डाऊनच्या अगोदर ८ ते १० रुपये किलो दराने जाणाऱ्या कलिंगडास सध्याच्या स्थितीत १ ते दिड रुपये दर व्यापारी मागू लागले. यामुळे माढ्यातील शहाजी चवरे या शेतकऱ्याने अडीच एकर शेतात लागवड केलेले कलिंगड सर्वांनाच मोफत वाटप करण्यास खुले केले. अन् बघता बघता कलिंगड मोफत मिळू लागल्याने सर्वजण पिशव्या भरुन कलिंगड घेऊन गेले.
चवरे यांची माढ्यातील गालिशा बाबा दर्ग्याच्या समोर १२ एकर शेती असून अडीच एकर शेतात त्यांनी शुगर किंग या जातीची लागवड केली होती. यासाठी त्यांचा १ लाख ३६ हजारांचा खर्च झाला. यामधून त्यांना ४ लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे कलिंगड पीक मार्केटला गेले नाही अन् कवडी मोल दर येऊ लागल्याने चवरे यांनी शेतातील कलिंगड सर्वांनाच मोफत वाटुन टाकले आहे. तर, दुसरीकडे परिसरात चवरे यांच्या दातृत्वाचे कौतुक होत आहे. संचारबंदीच्या अगोदर हेच कलिंगड मी बाजारात दाखवले होते, त्यावेळी ८ ते ९ रुपये दर होता. मात्र, लॉक डाऊन सुरू झाले आणी बाजार बंद, त्यामुळे दर कोसळले. यातच पाच व्यापाऱ्यांनी शेतात येऊन १ ते दिड रुपये किलो दर सांगितला. मात्र, या दरात व्यापाऱ्यांना देण्यापेक्षा मी सर्वच शेतातील कलिंगड मोफत वाटुन टाकली, असे शहाजी चवरे म्हणाले.