सोलापूर - बार्शीतील कोविड सेंटरमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हा रुग्ण बार्शी येथील छत्रपती शिवाजी महाराज पॉलिटेक्निक महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होता.
हेही वाचा - सोलापुरात सोमवार ते शुक्रवार दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी
स्वच्छतागृहात घेतला गळफास
आज पहाटे 5 च्या सुमारास रुग्णाने कोविड सेंटरमधील स्वच्छतागृहामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर प्रशासन हादरले आहे. कोविड सेंटरमधील अधिकाऱ्यांनी ताबडतोब बार्शी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
कोरोना आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा
रुग्णाने कोरोना आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. सोलापुरात जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करत कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये पसरले आहे. तसेच, क्वारंटाईन केलेल्या रुग्णांना किंवा उपचार घेत असलेल्या रुग्णांत भीतीचे वातावरण पसरले आहे, त्यामुळे अनेक नागरिक तणावाखाली आहेत.
हेही वाचा - कसला कोरोना अन् कसली जमावबंदी; सोलापूर मार्केट यार्डात गर्दीच गर्दी